मुंबई : दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या कामादरम्यान दुर्घटना आणि अपघातांची मालिका सुरूच आहे. मिरारोडच्या साईबाबा नगर येथे शनिवारी कामादरम्यान एका कर्मचाऱ्याचा ६५ फुटांवरून पडून मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचा ठपका ठेवून कंत्राटदाराला ५० लाख रुपये, तर सल्लागाराला ५ लाख रुपो दंड ठोठावला. मृताच्या कुटुंबास एमएमआरडीएकडून तातडीने ५ लाख रुपयांची मदत देण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो ९ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. साईबाबा नगर येथील मेट्रो स्थानकाच्या कामादरम्यान शनिवारी सकाळी १० च्या सुमारास सुपरवायझर फरहान तहजीब अहमदने (४२) स्थानकावर एका बाजूला पडलेल्या लोखंडी पट्ट्या उचलून नेण्यास कर्मचाऱ्यांना सांगितले. या लांब लोखंडी पट्ट्या उचलून नेताना त्या फरहानच्या दिशेने आल्याने त्या लागू नयेत यासाठी फरहान मागे झाला आणि त्याचा तोल जाऊन ६५ फुटांवरुन खाली पडला. त्याला तात्काळ सनशाईन रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर सनशाइन रुग्णालयाने फरहानला भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिल्याने त्याला सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र काही वेळातच डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणी मेट्रोच्या कामादरम्यान उंचावरुन पडून मृत्यूची झाल्याची नोंद मिरारोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गजानन जिंकलवाड यांनी दिली. प्रकल्पस्थळी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का याचा तपास सुरू आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
एमएमआरडीएने या प्रकरणाची दखल घेऊन वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेतील सल्लागार कंपनीतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. चौकशी अहवालानंतर दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. सुरक्षेत त्रुटी असल्याचा ठपका ठेवून कंत्राटदार मेसर्स एनए कन्स्ट्रक्शन इन्फ्रा कंपनीला ५० लाख रुपये दंड ठोठावला. तसेच सल्लागार मेसर्स सिस्ट्रा-सीईजी-सिस्ट्रा (आय) कंपनीला पाच लाख रुपये दंड करण्यात आला. मृताच्या कुटुंबास पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. कामगार भरपाई कायद्यानुसार भरपाई, विमा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ही मदतही कुटुंबास दिली जाणार आहे.
आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
मेट्रो ९ मार्गिकेच्या कामादरम्यान आतापर्यंत अनेक छोटेमोठे अपघात झाले आहेत. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार मे २०२५ पर्यंत विविध दुर्घटनांमध्ये पाच मृत्यू झाले आहेत. शनिवारच्या घटनेनंतर ही संख्या सहावर गेली आहे. सातत्याने या मार्गिकेच्या कामात अपघात होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रकल्पस्थळी सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना का नसतात असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.
