लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: मुंबईमधील खार पोलिसांनी किशोर पवार उर्फ बंटी नावाच्या ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली असून शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. नुकत्याच झालेल्या घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये चेंबूर पोलीस त्याचा शोध घेत होते.
आणखी वाचा-बेस्टच्या २७ पैकी १८ आगारांमध्ये ‘काम बंद’ आंदोलन, प्रवाशांची ससेहोलपट
बंटी टिटवाळा येथील रहिवासी असून यापूर्वी त्याला तीन वेळा हद्दपार करण्यात आले होते. त्याच्याविरूद्ध ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. अटक होण्यापूर्वी खार पश्चिम येथील एका चोरीच्या प्रकरणात पोलीस त्याचा शोध घेत होते. आरोपी त्याच परिसरातील अन्य घरांची पाहणी करून तेथे चोरी करण्याच्या प्रयत्नात तो होता. त्यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कुंभारे आणि तपास कर्मचार्यांच्या पथकाला बंटीला अटक करण्यात यश आले. त्याच्याकडे स्क्रू ड्रायव्हर आणि बनावट चाव्या सापडल्या आहेत.
आणखी वाचा-सरकारी रुग्णालयांमध्ये आता पूर्णत: मोफत उपचार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
आरोपी एका टोळीचा भाग असून या टोळीने खार परिसरातच ३५ घरफोड्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी बंटीला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या टोळीतील इतर साथीदारांची, तसेच त्याने कोणत्या ठिकाणी चोरी केली याची माहिती घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.