मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील कांबळीवाडी परिसरातील जैन मंदिराचे अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत मुंबई महापालिकेने केलेली कारवाई ही नियमानुसार आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच केली, असे मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले. मात्र त्याच वेळी मंदिरावर तोडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याच्या बदलीवर मुंबई महापालिका प्रशासन ठाम आहे.

विलेपार्ले पूर्व येथील तेजपाल मार्गावरील नेमिनाथ सोसायटीच्या आवारातील जैन मंदिराचे अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने १६ एप्रिल रोजी पाडले. मात्र विश्वस्त मंडळातील पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत या कारवाईवर स्थगिती मिळवली. त्यानंतर या कारवाईच्या निषेधार्थ जैन समाजातील नागरिकांनी मोठा मोर्चा काढला. त्यात सर्वच राजकीय पक्षांतील नेते सहभागी झाले. राजकीय दबाव वाढल्यामुळे के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांच्याकडून विभाग कार्यालयाचा पदभार काढून घेण्यात आला. विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे पाडकाम कारवाईला ३० एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात ३० एप्रिल रोजी सुनावणी झाली. सुनावणीत पाडकामावरील स्थगिती ५ मेपर्यंत वाढवण्यात आली.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुनावणीच्या वेळी शपथपत्र सादर केले. त्यात या मंदिराशी संबंधित संपूर्ण वादाचा गेल्या २० वर्षांचा घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे या प्रकरणी न्यायालयात विविध खटले सुरू आहेत. नगर दिवाणी न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले असून त्यात हे मंदिर अनधिकृत असल्याचे आढळून आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर तोडक कारवाई करण्यात आल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

मनोरंजनाची जागा हलवण्याची महापालिकेची तयारी

हे मंदिर नेमिनाथ सोसायटीच्या आवारात असून हे बांधकाम सोसायटीच्या मनोरंजनासाठी आरक्षित जागेवर आहे. त्यामुळेच हे मंदिर अनधिकृत ठरले आहे. मुंबई महापालिकेने आपल्या शपथपत्रात कारवाई योग्य असल्याचे म्हणतानाच मनोरंजनाची जागा हलवण्याबाबतचा प्रस्ताव आल्यास त्यावर विकास नियंत्रण नियमावलीनुसार विचार करू, असेही म्हटले आहे. परंतु मनोरंजनाची जागा हलवण्यासाठी हे मंदिर ज्या सोसायटीच्या आवारात आहे, त्या सोसायटीची परवानगी लागणार आहे. मात्र सोसायटीचाच या मंदिराला विरोध असल्यामुळे ही परवानगी मिळणे अवघड आहे. त्यामुळे हा वाद चिघळत राहण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्याच्या बदलीवर मात्र प्रशासन ठाम

जैन मंदिराच्या पाडकाम कारवाईनंतर वाद उफाळून आल्यामुळे के- पूर्व विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांच्याकडून या विभागाचा पदभार काढून घेण्यात आला. त्यांना घनकचरा विभागातील उपप्रमुख अभियंता पदावर पुन्हा पाठवण्यात आले.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत कारवाई केल्यानंतरही राजकीय दबावापोटी पालिका अधिकाऱ्यावर बदलीची कारवाई केल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. तसेच या कारवाईविरोधात पालिकेतील अभियंत्यांच्या संघटनेने आंदोलनही केले.

सहाय्यक आयुक्त घाडगे यांची बदली केल्यानंतर तात्पुरता पदभार सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आला होता.

आयुक्तांनी के- पूर्व विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार नितीन शुक्ला यांच्याकडे सोपवला.