मुंबई : चिकोरी मिश्रित कॉफीच्या उत्पादनांवर कॉफी आणि चिकोरीचे प्रमाण २९ उत्पादक नमूद करत नसल्याचे आढळले आहे. या उत्पादनांवर हे प्रमाण नमूद करणे बंधनकारक असल्यामुळे यानंतर या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर कारवाई करण्याच्या सूचना अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने(एफएसएसएआय) दिल्या आहेत.
चिकोरी झाडाच्या मुळांचा वास कॉफीप्रमाणेच येतो. तसेच यात कॅफिनही नसते. त्यामुळे चिकोरीच्या मुळाची पूड आणि कॉफी याचे मिश्रण असलेली उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.
चिकोरी आणि कॉफी मिश्रित उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या मोठय़ा आणि मध्यम अशा ४२ उत्पादनांची पाहणी नुकतीच एफएसएसएआयने नुकतीच केली. यातील १३ उत्पादनांच्या वेष्टनावर कॉफी आणि चिकोरी याचे उत्पादनातील प्रमाण नमूद केले होते. परंतु अन्य २९ उत्पादनांवर मात्र याबाबत कोणताही उल्लेख केला नसल्याचे या पाहणीत आढळले आहे.
अन्न सुरक्षा आणि मानके नियमन २०११ च्या कायद्यानुसार, चिकोरी मिश्रित कॉफीच्या उत्पादनामध्ये कॉफीचे प्रमाण ५१ टक्क्यांपेक्षा कमी नसावे. तसेच हे प्रमाण उत्पादनाच्या वेष्टनावर नमूद केलेले असावे असे ही या कायद्यात स्पष्ट केले आहे. मात्र तरीही अनेक उत्पादनांमार्फत याचे पालन केले जात नाही. त्यामुळे अशा उत्पादकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा एफएसएसआयने दिलेला आहे.
काय होते? चकोरीच्या मुळाची पूड करणे हे कॉफीच्या तुलनेत स्वस्त आहे. त्यामुळेदेखील याचा वापर वाढला आहे. कॉफीच्या तुलनेत चिकोरीमध्ये कॅफिन शून्य असल्यामुळे चिकोरीचा वापर करणे आरोग्यदायी आहे. परंतु चिकोरीच्या मुळांचा वास कॉफीप्रमाणे असला आणि चव ही थोडी गोडसर असली तरी कॉफीत अधिक प्रमाणात मिसळल्यास कॉफीसारखी उत्कृष्ट चव येत नाही. त्यामुळे या मिश्रणामध्ये चिकोरीचे प्रमाण ४९ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे एफएसएसआयने निर्धारित केले आहे. लगेचच तयार होणाऱ्या (इन्स्टंट) कॉफीमध्येही चिकोरीचे हेच प्रमाण असणे कायद्याने बंधनकारक आहे.