scorecardresearch

गोवर प्रतिबंधासाठी दहा कलमी कृती योजना

राज्यात गोवरला प्रतिबंध करण्यासाठी स्थापन केलेल्या कृतिदलाची सोमवारी पुण्यात बैठक झाली.

गोवर प्रतिबंधासाठी दहा कलमी कृती योजना
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

कृतिदलाच्या बैठकीत निर्णय; रुग्णांचे गतिमान सर्वेक्षण, विशेष लसीकरण मोहिमा

मुंबई : रुग्णांचे गतिमान सर्वेक्षण, अतिसंवेदनशील भागांचा शोध, विशेष लसीकरण, कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष, आंतरविभागीय समन्वय, दीर्घकालीन उपाययोजनेसाठी आवश्यक संशोधन, लोकसहभाग आणि आरोग्य शिक्षण असा दहा कलमी कार्यक्रम राज्यात मोठय़ा प्रमाणात पसरत असलेल्या गोवरला प्रतिबंध करण्यासाठी स्थापन केलेल्या राज्यस्तरीय कृतिदलाने सोमवारी झालेल्या बैठकीनंतर निश्चित केला आहे.

राज्यात गोवरला प्रतिबंध करण्यासाठी स्थापन केलेल्या कृतिदलाची सोमवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये गोवरला प्रतिबंध करण्यासंदर्भातील करायच्या उपाययोजनांचा आराखडा अंतिम करण्यात आला. यामध्ये राज्यातील ताप आणि पुरळ आलेले रुग्ण शोधण्यासाठीचे सर्वेक्षण अधिक वेगवान करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर अतिसंवेदनशील भागांचा शोध घेण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी विशेष लसीकरण अभियान आणि उद्रेक प्रतिसाद लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी विभागीय स्तरावर शीघ्र प्रतिसाद पथके आणि स्थानिक सूक्ष्म कृतिआराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती गोवर राज्यस्तरीय कृतिदलाकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे राज्यातील प्रत्येक भागातील कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. कुपोषित बालकांना प्राधान्याने उपचारात्मक पोषण, जीवनसत्त्व अची मात्रा आणि त्यांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. नगरविकास, महिला आणि बालकल्याण आणि अल्पसंख्याक कल्याण विभाग यांच्यामध्ये नियमित समन्वय साधण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. गोवरच्या रुग्णांचा तपास तातडीने व्हावा यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्या अधिक वेगवान करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात गोवर प्रयोगशाळेचे जाळे अधिक विस्तृत करण्यात येईल. त्याचप्रमाणे गोवर रुग्ण आणि मृत्यूचे सखोल साथरोगशास्त्रीय विश्लेषण आणि त्यानुसार कृती योजना, दीर्घकालीन उपाययोजनेसाठी आवश्यक संशोधन आणि सर्वागीण शहरी आरोग्य यंत्रणेसाठी योजना आखण्यात येणार आहेत. तसेच गोवर उपचारासंदर्भात नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी सामाजिक प्रबोधन, लोकसहभाग आणि आरोग्य शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचे कृतिदलाकडून स्पष्ट करण्यात आले.

कृती योजना अशी..

  • ताप-पुरळ रुग्णांचे गतिमान सर्वेक्षण
  • गोवर अतिसंवेदनशील भागांचा शोध
  • विभागीय स्तरावर शीघ्र प्रतिसाद पथके आणि स्थानिक सूक्ष्म कृती आराखडा
  • ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी विशेष लसीकरण अभियान आणि उद्रेक प्रतिसाद लसीकरण
  • कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष
  • आंतरविभागीय समन्वय
  • गोवर उपचार मार्गदर्शन सूचना
  • गोवर प्रयोगशाळा जाळे विस्तृत करणे
  • गोवर रुग्ण आणि मृत्यूचे सखोल साथरोगशास्त्रीय विश्लेषण, त्यानुसार कृती योजना, दीर्घकालीन उपाययोजनेसाठी आवश्यक संशोधन आणि सर्वागीण शहरी आरोग्य यंत्रणेसाठी योजना
  • सामाजिक प्रबोधन, लोकसहभाग आणि आरोग्य शिक्षण

मुंबईत कानपूरमधील संशयित रुग्ण

मुंबई : उत्तर प्रदेशमधील कानपूर येथून मुंबईत आपल्या कुटुंबीयांसह आलेला सहा वर्षीय मुलगा गोवर संशयित असल्याचे आढळले आहे. सध्या मुंबईसह देशभरात गोवरची साथ पसरत असल्याने चैत्यभूमीवर येणाऱ्या लहान बालकांची महापालिकेच्या जी उत्तर प्रभागातर्फे विशेष आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून १५ तुकडय़ा कार्यरत आहेत. कानपूरमधून सोमवारी मुंबईत आलेल्या सहा वर्षांच्या मुलाला ताप आणि त्याच्या चेहऱ्यावर व अंगावर पुरळ असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. तातडीने या मुलाची तपासणी करून त्याला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात या मुलावर उपचार करून त्याला ‘अ’ जीवनसत्वाची मात्रा देण्यात आली. मात्र रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास पालकांनी नकार दिला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:48 IST

संबंधित बातम्या