लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : विना हेल्मेट दुचाकी चालविणे, भरधाव वाहने चालवून वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, नशा करून वाहने चालविणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करण्यासह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे भीषण अपघात घडतात. त्यात अनेकांचा मृत्यू होत असून आणि अनेकजण जखमी होतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत वारंवार जनजागृती करून देखील अनेक वाहनधारक नियमांची पायमल्ली करत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत, म्हणजेच २०२३-२४ या वर्षात परिवहन विभाग आणि पोलीस विभाग यांच्या एकत्रित कारवाईतून २,२६३ वाहनधारकांचे अनुज्ञप्तीचे निलंबन केले आहे.
मुंबईत सर्रासपणे विना हेल्मेट दुचाकी चालवणे सुरू आहे. यासह सिग्नल मोडणे, भारक्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहतुकीतून प्रवासी वाहतूक करणे, प्रवासी वाहनातून मालवाहतूक करणे, भाडे नाकारणे असे प्रकार घडत असतात. यावर ठोस कारवाई होत नसल्याने, वाहनधारक बिनधास्तपणे नियमांचा भंग करून वाहन चालवतो. मात्र, २०२३-२४ या वर्षात परिवहन विभागाने ठोस कारवाई करत वाहनधारकांचे अनुज्ञप्तीचे निलंबन केले. त्यासह गेल्या आर्थिक वर्षात एकूण १०,५०० रिक्षा-टॅक्सी वाहनांची तपासणी केली असता, यात ३,४०० रिक्षा-टॅक्सी वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून ६१.०५ लाखांची दंडवसुली केली. तर, ८५८ प्रकरणी परवाना व अनुज्ञप्ती निलंबन करण्यात आले.
तसेच रिक्षा-टॅक्सीमधून मालवाहतूक करणाऱ्यांची १,६२५ प्रकरणांची नोंद झाली. यातून २९.७४ लाखांचा दंड वसूल केला. तसेच ६०१ प्रवासी बसची तपासणी केली असता, अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी १८५ दोषी वाहने आढळून आली. त्यांच्याकडून ५६.२६ लाखांची वसुली करण्यात आली. तसेच अवैध विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी शालेय बस आणि इतर वाहने असे एकूण १,७९३ वाहनांची तपासणी केली असता, यात ३३५ वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून १४.०२ लाख रूपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.