मुंबई : गेले कित्येक दिवस तहान-भूक हरपून केलेल्या तालमी, तनमनात भिनलेले नाटक घेऊन ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर आपापल्या विभागात अव्वल ठरलेल्या महाविद्यालयीन रंगकर्मीसमोर जेतेपदाचा क्षण अनुभवण्याची संधी येऊन ठेपली आहे. राज्यभरातून निवडून आलेल्या आठ एकांकिकांमध्ये ‘लोकसत्ता लोकांकिका’चा बहुमान मिळवण्यासाठी होणारी अटीतटीची लढाई आज महाअंतिम सोहळय़ात अनुभवता येणार आहे. तरुणाईच्या या रंगमंचीय आविष्काराला दाद देण्यासाठी प्रसिध्द अभिनेते परेश रावल हे ‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम सोहळय़ात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे हे रावल यांच्याशी संवाद साधणार असून ते या महाअंतिम सोहळय़ाचे आणखी एक आकर्षण ठरणार आहे. 

‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी, १७ डिसेंबरला प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात रंगणार आहे. आठ केंद्रांवरून प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेल्या आणि महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या एकांकिकांचे संघ ‘लोकसत्ता लोकांकिका’चा बहुमान मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेले तीन ते चार आठवडे राज्यभरातील तरुणाई ‘लोकांकिका’मय झाली आहे. आशयघन एकांकिकांचे सादीकरण आणि महाविद्यालयांची अनोखी ऊर्जा, अवतीभवती घडणाऱ्या घटनांवर कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची त्यांची तळमळ असा आगळा माहोल रसिकांना अनुभवता आला. आता अंतिम फेरीसाठी पुन्हा एकदा त्याच तयारीने रंगमंचावर उतरण्यासाठी आठही महाविद्यालयांचे संघ सज्ज झाले आहेत. करोनामुळे दोन वर्षांच्या खंडांनंतर ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर अतिशय उत्साहात आणि दणक्यात पार पडली. यावर्षी लोकांकिका स्पर्धा होणारच या विश्वासाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धेची घोषणा होण्याआधीपासूनच आपापल्या स्तरावर संहिता लेखनापासून जय्यत तयारी सुरू केली होती. त्यानंतरही सत्रांत परीक्षा, इतर एकांकिका स्पर्धा यातून वेळ काढत महाविद्यालयांच्या सहकार्याने या तरुण रंगकर्मीनी ‘लोकसत्ता लोकांकिका’चे प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरीचे आव्हान पूर्ण केले. आता ध्यास यावर्षीच्या जेतेपदाचा.. आठही संघांतील रंगकर्मीचे लक्ष आता अंतिम फेरीतील आपल्या सादरीकरणावर एकवटले आहे.

‘लोकसत्ता’ आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, सहप्रायोजक ‘झी युवा’, ‘टुगेदिरग’, पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘अस्तित्व’चे सहाय्य तसेच ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर म्हणून लाभलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम सोहळा न्यवर परीक्षक, प्रायोजक, नाटय़-चित्रपट वर्तुळातील नामवंतांच्या मांदियाळीत रंगणार असून ‘लोकसत्ता लोकांकिका’चा बहुमान कोण पटकावणार याचे उत्तरही मिळणार आहे.

महाअंतिम फेरीतील एकांकिका

उकळी – कीर्ती एम. डुंगरसी महाविद्यालय, मुंबई

टॉक – न्यू ऑर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, औरंगाबाद

हर्लेक्युईन – सौ. स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ अ‍ॅप्लाइड आर्ट्स, परफॉर्मिग आर्ट्स अ‍ॅण्ड फॅशन डिझाइन महाविद्यालय, नाशिक

डोक्यात गेलंय – सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे

न्यायालयात जाणारा प्राणी- विठ्ठलराव खोब्रागडे महाविद्यालय, नागपूर

मध्यांतर – बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी), पुणे

कुपान – गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी

विषाद – डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

महाअंतिम सोहळा..

* कधी : आज, १७ डिंसेंबर 

* कुठे : रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी

* वेळ : सकाळी ९.३० वा.

या सोहळय़ाच्या विनामूल्य प्रवेशिका १७ डिसेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून रवींद्र नाटय़मंदिर येथे उपलब्ध होतील. एका व्यक्तीला एक प्रवेशिका दिली जाईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रायोजक : लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा सहप्रायोजक ‘झी युवा’ आणि ‘टुगेदिरग’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’तर्फे आहे. साहाय्य ‘अस्तित्व’चे आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट, मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन‘ टॅलेंट पार्टनर आहेत.