सौरभ कुलश्रेष्ठ

मुंबई : मुंबई उपनगरातील वीज वितरण व्यवसायात जम बसवल्यानंतर महाराष्ट्रात महावितरणच्या परिसरात विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या अदानी समूहाने नवी मुंबई महानगरपालिका आणि लगतच्या परिसरात वीज वितरणाचा समांतर परवाना मागण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. अदानीचे हे सीमोल्लंघन महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रात खासगीकरणाचे पर्व सुरू करण्यासाठीचे पहिले पाऊल मानले जात आहे. नवी मुंबईचा परिसर हा महावितरणला घसघशीत महसूल देणाऱ्या राज्यातील निवडक परिसरांपैकी एक आहे. शिवाय भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणात विकास होणार आहे. त्यामुळेच अदानीने महाराष्ट्रात आपला वीज व्यवसाय विस्तारण्यासाठी सर्वप्रथम नवी मुंबईची निवड केली आहे.

flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर
Why is the demand for office spaces increasing in Pune
पुण्यात कार्यालयीन जागांना का वाढतेय मागणी? जाणून घ्या कारणे…

मुंबई उपनगरातील रिलायन्सचा वीज वितरण व्यवसाय ताब्यात घेऊन चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. विस्ताराचे वेध लागले आहेत. मुंबई उपनगराच्या पलीकडे इतर भागांत वीज वितरण व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना अदानीने आखली असून केंद्रीय वीज कायद्यातील दुरुस्ती काही कारणांनी रखडली तरी उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गाचा उपयोग करून नव्या भागांत विस्तारीकरण करण्याचा अदानी समूहाचा मानस असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ३१ ऑगस्टला दिले होते. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि.चे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प पटेल यांनी वीज वितरण व्यवसाय विस्ताराच्या आकांक्षांचे संकेत ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले होते. देशातील वीज वितरण क्षेत्रात खासगी क्षेत्राला वाव देणारी दुरुस्ती केंद्रीय वीज कायद्यात लवकर झाली नाही तरी कायद्यातील सध्याच्या तरतुदींचा वापर करून वीज वितरण व्यवसायाचा विस्तार करता येईल, असे पटेल यांनी स्पष्ट केले होते.

अदानी समूहाने वीज वितरण व्यवसायाचा महाराष्ट्रात विस्तार करण्याच्या या महत्त्वाकांक्षेला मूर्तरूप देण्यासाठी आता पहिले पाऊल टाकले आहे. सध्या महावितरणच्या अखत्यारीत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका आणि लगतच्या परिसरात वीज वितरण करण्याचा समांतर परवाना मिळावा यासाठी अदानी समूहाने वीज आयोगाकडे अर्ज केला आहे, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय वीज कायद्यात वीज वितरण परवान्याबाबतच्या कलमात असलेल्या तरतुदींचा वापर करून अदानीने हा अर्ज केल्याच्या समजते. पुरेसे भांडवल, बाजारातील पत आणि आचारसंहिता या निकषांची पूर्तता करणाऱ्याला समांतर वीज वितरण परवाना मिळू शकतो अशी मुभा त्या नियमांमध्ये आहे, असे सांगण्यात आले.

आता वीज आयोग या अर्जाची छाननी करेल आणि लोकांकडून सूचना हरकती मागवून त्यावर निर्णय देईल अशी प्रक्रिया आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई उपनगरात तत्कालीन रिलायन्सच्या वीज वितरण परवाना क्षेत्रात टाटा पॉवरला समांतर परवाना देण्यात आला होता. त्या वेळी रिलायन्सची विद्युत यंत्रणा वापरण्याची मुभा टाटा पॉवरला देण्यात आली होती. समांतर विद्युत यंत्रणा उभारणीच्या कोटय़वधी रुपये खर्चाचा बोजा वीज ग्राहकांवर पडू नये यासाठी तो निर्णय घेण्यात आला होता. आता नवी मुंबईत अदानीला महावितरणची विद्युत यंत्रणा वापरण्याची परवानगी मिळते की त्यांना स्वत:ची विद्युत यंत्रणा उभारण्याची अट टाकून वीजपुरवठा करण्याची परवानगी मिळते याबाबत उत्सुकता असणार आहे.