मुंबई : मुंबई महानगरपालिकेची मुलुंड कचराभूमी येथील १५ एकर जागेची मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाने केली आहे. ही जागा तात्पुरत्या स्वरुपात (भाडेतत्त्वावर) द्यावी अशा आशयाचे पत्र प्राधिकरणाने मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवले आहे. ही जमीन देण्यासाठी भाडे आकारणी कशाच्या आधारे करावी याकरीता मुंबई महापालिका प्रशासन विचार करीत आहे. धारावी पुनर्विकास प्राधिकरणासाठी यापूर्वीच मुलुंड कचराभूमीची ४१ एकर जागा देण्याची मागणी प्राधिकरणाने मुंबई महापालिकेकडे केली होती. मात्र आता तातडीने १५ एकर जागा कास्टिंग यार्डसाठी देण्याची मागणी केली आहे.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसराच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संपूर्ण मुंबईतील विविध ठिकाणच्या जागांची मागणी केली आहे. या प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणची जमीन सरकार ताब्यात घेत आहे. मुंबई महानगरपालिकेकडे धारावी पुनर्वसन प्राधिकरणाने आधीच मुलुंडमधील एकूण ५६ एकर जागा मागितली होती. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सात वर्षे लागणार आहेत. तर विक्रीसाठी असलेला भाग पूर्ण करण्यासाठी १० वर्षे लागणार आहेत. या कामासाठी कास्टींग यार्ड म्हणून मुलुंड कचराभूमी येथील १५ एकर जमीन १० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर द्यावी, अशी मागणी धारावी पुनर्वसन प्राधिकरणाने व विशेष हेतू कंपनीने केली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विशेष हेतू कंपनी नवभारत मेगा डेव्हलपर्सला ही जागा कास्टींग यार्डसाठी हवी आहे. तातडीने ही जमीन दिल्यास त्यावर प्रीकास्ट प्लाण्टचे काम सुरू करता येईल, असे या पत्रात म्हटले आहे. मुलुंड कचराभूमीवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. हा प्रकल्प पालिकेने २०१८ मध्ये हाती घेतला होता. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ६० टक्के काम झाले असून २० लाख मेट्रीक टन कचरा शिल्लक आहे. तर १५ एकर जागा साफ केली आहे. ही जागा आता कास्टिंग यार्डसाठी मागण्यात आली आहे.
दरम्यान, धारावी प्रकल्पासाठी आधीच देवनार कचराभूमीची १२४.३ एकर जागा देण्याचा निर्णय झाला आहे. देवनार कचराभूमीवर गेल्या सुमारे शंभर वर्षांपासून जुना कचरा साठला आहे. या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून ही जमीन रिकामी करून देण्याची मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्पाने केली आहे. त्यानुसार हा कचरा हटवण्यासाठी कंपनी नेमण्यासाठी निविदा प्रकिया सुरू आहे.