मुंबई : बसमधून उतरणाऱ्या प्रवाशाला जलद गतीने इच्छितस्थली पोहोचता यावे यासाठी बेस्ट उपक्रमाने जून २०२२ पासून अंधेरीमधील बस थांब्यावर प्रायोगिक तत्वावर विजेवर धावणाऱ्या दुचाकीची सेवा उपलब्ध केली असून अंधेरीतील हा प्रयोग यशस्वी झाल्याने दुचाकी सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये विजेवर धावणाऱ्या एक हजार दुचाकी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. यासाठी ॲपआधारित वीजेवर धावणाऱ्या दुचाकींची सेवा देणाऱ्या एका कंपनीबरोबर भागिदारी करण्यात आली आहे.

हेही वाचा : स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत आणि उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी बेस्ट उपक्रमाने बस सेवेला जोड म्हणून अंधेरीमधील काही थांब्यांवर प्रायोगिक तत्वावर विजेवर धावणाऱ्या दुचाकींची सेवा उपलब्ध केली. बसमधून उतरल्यानंतर प्रवाशांना तात्काळ इच्छितस्थळी पोहोचता यावे यासाठी ही जोड सेवा सुरू करण्यात आली. अंधेरीमधील ४० ठिकाणी विजेवर धावणाऱ्या १८० दुचाकी उपलब्ध करण्यात आल्या असून दररोज सुमारे २०० प्रवासी दुचाकी सेवेचा लाभ घेत आहेत.

हेही वाचा : झारखंडमध्ये हत्या करून पळून आलेल्या आरोपीला धारावीत अटक

या दुचाकींचा वेग प्रतितास २५ किलोमीटर इतका आहे. प्रति तीन किलोमीटर प्रवासासाठी २० किमान भाडे आकारण्यात येत असून त्यापुढील प्रत्येक मिनिटासाठी दीड रुपया आकारणी करण्यात येत आहे.  या दुचाकी सेवेसाठी प्रवाशांना वोगो ॲपचा वापर करावा लागत आहे. अंधेरीतील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईत अन्य भागातही ही सेवा सुरू करण्याचा बेस्ट उपक्रमाचा मानस असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार मुंबईतील प्रमुख बस थांब्यांवरून व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

सध्या प्रायोगिक तत्वावर अंधेरीमध्ये विजेवर धावणाऱ्या दुचाकींची सेवा उपलब्ध करण्यात आली आहेत. येत्या सहा महिन्यांमध्ये अशा आणखी एक हजार दुचाकीचा ताफ्यात समावेश करून या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. अंधेरी पूर्व येथे डायनेस्टी बिझनेस पार्क, जे. बी. नगर मेट्रो स्थानकाजवळ, अंधेरी पूर्व आकृती स्टार, चकाला औद्योगिक क्षेत्र, अंधेरी पूर्वमधील टेक्नोपोलिस नॉलेज पार्क, अंधेरीमधील बस स्थानक, आगरकर चौक बस थांबा, सहार रोड, रेल्वे कॉलनी आधी ठिकाणी ही दुचाकी सेवा उपलब्ध आहे. यापाठोपाठ आता वांद्रे – कुर्ला संकुलासह दक्षिण मुंबई आणि अन्य काही भागातील बस मार्गांवर दुचाकी सेवा उपलब्ध करण्याचा विचार आहे. विजेवरील दुचाकी वापरण्यासाठी आणखी काही वेगवेगळ्या संकल्पना राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.