मुंबई : दरवर्षी उन्हाळयामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण होतो आणि त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने आध्यात्मिक आणि सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत राज्यभरात फेब्रुवारीमध्ये ८४७ रक्तदान शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे तूर्तास राज्यात रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे.

दरवर्षी उन्हाळयात निर्माण होणारा रक्ततुटवडयाचा प्रश्न लक्षात घेत यंदा राज्य रक्त संक्रमण परिषदेने आधीपासून प्रयत्न सुरू केले. त्यानुसार रक्त संक्रमण परिषद आणि श्री जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे १० ते २५ फेब्रुवारीदरम्यान राज्यभर विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. १५ दिवसांत ८४७ रक्तदान शिबिरांचे आयोजन करून ७८,२२१ युनिट रक्त संकलित करण्यात आले.

हेही वाचा >>> राजकीय अस्वस्थता कायम; महायुती, महाविकास आघाडीमध्ये तणाव

उन्हाळयात रक्तदान करताना..

उन्हाळयामध्ये रक्तदान केल्याने आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. मात्र रक्तदान करण्यापूर्वी सबंधित व्यक्ती भर उन्हातून गेली असेल किंवा तिच्या शरीरातील पाणी कमी झाले असेल (निर्जलीकरण) तर तिने रक्तदान करू नये. निर्जलीकरण झालेले असताना रक्तदान केल्यास रक्तदाब कमी होण्याची किंवा चक्कर येण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तदानापूर्वी थोडी विश्रांती घ्यावी आणि भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन, मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी केले. 

उन्हाळयात रक्तटंचाई का?

उन्हाळयात मार्च ते मे दरम्यान नागरिक पर्यटनाला किंवा गावाकडे जातात. नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने रक्तदान शिबिरे आयोजनाचे प्रमाण घटते. परिणामी दरवर्षी उन्हाळयात मोठया प्रमाणावर रक्ततुटवडा निर्माण होतो. त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून गणेशोत्सव मंडळे, धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, विविध संघटना, मित्र मंडळांना रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले जाते.

राज्यातील रक्तसाठा

’रक्तपेढया – ३७७

’रक्त – ७६,२५९ युनिट

’प्लेटलेट्स -१३९३ युनिट

मुंबईतील रक्तसाठा

’रक्तपेढया – ५४

’रक्त – ९१८६ युनिट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’प्लेटलेट्स – ३०९ युनिट