मुंबई : लोकसभा निवडणुकीत मृत मतदार मतदान करतात आणि नंतर त्यांचे नाव मतदार यादीतून डिलीट केले जाते. वरळी मतदारसंघात ही तब्बल १९ हजार ३३३ मतदार संशयाच्या भोवऱ्यात आहेत, असे शिवसेना (ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगत आयोगाच्या मतदार यादीतील घोळावर बोट ठेवले.

शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींच्या पद्धतीने सादरीकरण करीत मतदार यादीतील घोळ समोर आणला. वरळीत लोकसभेत २,५२,९७० आणि विधानसभेत २,६३,३५२ मतदारांपर्यंत वाढ झाली. हा घोटाळा त्या वेळी लक्षात आला नाही. यावेळी एकूणच १६०४३ नवीन मतदारांची भर आणि ५६६१ मतदारांची वजाबाकी झाली. यातूनच १९३३३ मतदार संशयास्पद आहेत. वरळीत एवढे तर मुंबईत असे लाखो असतील. त्यामुळे ही लढाई फक्त प्रचाराची नाही, तर सत्य उघड करण्याची आहे. मतदार यादी हातात घ्या, प्रत्येक नाव तपासा, असे आवाहन शिवसैनिकांना करताना निवडणूक आयोग भाजपचे काम करत आहे, म्हणूनच आपल्यालाच त्यांचे कर्तव्य पार पाडावे लागेल, असे ठाकरे म्हणाले.

धानसभेनंतर १२०० मतदार यादीतून वगळले गेले. मात्र निवडणुकीत त्यांच्या नावाने मतदान झाले असण्याचा संशय आहे. काही मतदारांचे फोटोच नाहीत, काहींच्या पत्त्यावर फक्त ‘झोपडपट्टी’ एवढेच लिहिले आहे. एका छोट्या घरात ३८ मतदार दाखवले गेले असून, अशा २१४ घरांचा तपशील आमच्याकडे आहे. इतकेच नव्हे तर घसिटराम हलवाई दुकानात ४८ मतदारांची नोंद असल्याचे आदित्य ठाकरे आकडेवारीत दाखवून दिले.

मतदार आणि वडिलांचे नाव एकसारखे असलेले 502 मतदार आहेत. त्यात ‘म्हात्रे’ नावाच्या मतदारांचे वडील ‘पटेल’ असलेले ७२० मतदार असून महिलांचे लिंग ‘पुरुष’ म्हणून नोंदवलेले ६४३ प्रकरणे आहेत. तर २८ मतदारांकडे एपिक नंबरच नाही, तर १३३ मतदारांचे एपिक नंबर एकसारखे असून काही मतदारांना दोन वेगळे एपिक नंबर देण्यात आले आहेत. तर नरहरी कुलकर्णी या मतदाराला लोकसभेत मृत दाखवून वगळण्यात आलं होतं, पण विधानसभेत ते पुन्हा जिवंत झाले आणि मतदानही झाल्याचे सांगत स्पष्ट वोटिंग फ्रॉड आहे, असा आरोपही केला. दरम्यान, वरळीत १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ११३ मतदार आहेत. त्यामुळे जास्त जगायचे असेल तर वरळीत या अशा चिमटा काढला. यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मुंबईला ‘अदानीस्तान’ होऊ द्यायचे नसेल, तर हा घोटाळा उघड करा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले.