मुंबई : मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी जनतेसाठी आम्ही एकत्रितपणे म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी म्हणून काम करायला हवे, असे विधान केल्याने ठाकरेंचा फडणवीसांशी सलोखा वाढत असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

हिवाळी अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले. त्यापाठोपाठ आदित्य ठाकरे यांनी तिसऱ्यांदा फडणवीस यांची भेट घेत मतदारसंघातील समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

आताच्या घडीला फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विरोधक म्हणून आम्ही काही प्रश्न त्यांच्याकडे मांडत असू, तर त्यात काहीच चुकीचे नाही. जनतेसाठी एकत्रितपणे म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी म्हणून काम करायला हवे, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>धार्मिक कट्टरता कमी करणे आवश्यक! अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांचे आवाहन

पोलिसांसाठी कायमस्वरूपी घरे, पोलीस वसाहतींच्या समस्या, गिरणी कामगारांची घरे आदी प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे आदित्य यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मविआ सरकारच्या काळातील जी सर्वांसाठी पाणी योजना होती, ती पुन्हा सुरू करावी. मुंबईतील प्रत्येकाला पाणी मिळायला हवे. मागच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठवण्याबाबत फडणवीस सकारात्मक आहेत. – आदित्य ठाकरे, शिवसेना नेते