मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळी गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. यामुळे शिंदे गटात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचेच शुद्धीकरण करण्याची गरज असून त्यांना गोमुत्राने स्नान करावे लागेल, असा टोला शिंदे गटाने लगावला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी एकनाथ शिंदे आणि काही मंत्री व शिंदे गटातील आमदार शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर उद्धव बाळासाहेब शिवसेनेतील शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. हा प्रकार हास्यास्पद असल्याचा टोला शिंदे गटाने लगावला आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांना माफीवीर म्हणणाऱ्या राहुल गांधी यांना आदित्य ठाकरे यांनी मिठी मारली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचेच शुद्धीकरण करण्याची गरज असल्याचा टोला शिंदे गटाने लगावला आहे.
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी याबाबतची ध्वनीचित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित केली आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल अनेक वेळा वादग्रस्त व्यक्तव्य केले असून ते निषेधार्ह आहे. आदित्य ठाकरे यांनाच आता गोमूत्राने स्नान करण्याची गरज असल्याचा टोला म्हात्रे यांनी लगावला आहे.