मुंबई : बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस या अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद मिळाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या अभ्यासक्रमासाठी आणखी एक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या सूचनेनुसार या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या अतिरिक्त सीईटीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना २० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस अभ्यासक्रमांसाठी एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध असून यंदा घेण्यात आलेल्या सीईटीसाठी ७२ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ६१ हजार ६६६ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. २९ व ३० एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेला कमी प्रतिसाद मिळाल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याचे आव्हान उच्च व तंत्र शिक्षण विभागासमोर निर्माण झाले होते. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरुवात होत असताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आणखी एक सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे. त्सासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून १२ जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी एप्रिलमध्ये झालेली परीक्षा दिली होती ते विद्यार्थी सुद्धा अतिरिक्त परीक्षेस बसू शकतील. त्यांच्यासाठी दोन्ही परीक्षांमधून ज्या परीक्षेत जास्त गुण मिळाले असतील ती गुणपत्रिका ग्राह्य धरली जाणार आहे. त्सासाठी विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांचे गुण ऑनलाइन प्रणालीवर अपलोड करावे लागणार आहे. नोंदणीनंतर अतिरिक्त सीईटी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. अभ्यासक्रम व माहिती पुस्तिका अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी mahacet.org या संकेतस्थळावर माहिती तपासावी, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही सीईटी केवळ बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमासाठीच असेल. परीक्षा आधीच्या नमुन्यानुसारच होणार आहे. अतिरिक्त सीईटीची पद्धत, अभ्यासक्रम या पूर्वी झालेल्या परीक्षेप्रमाणेच राहणार आहे. तसेच गुणांकनासाठी पर्सेंटाईल पद्धती वापरली जाणार असल्याचेही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे.