मुंबई : मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेली पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मंगळवार, १३ मेपासून सुरू करण्यात येत आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग मंगळवार, १ जुलै २०२५ पासून सुरु करण्यात येणार असून सर्व पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांनी संबंधित वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या संकेतस्थवळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर एका चित्रफितीची लिंकही देण्यात आली आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

• ऑनलाईन नावनोंदणी आणि प्रवेश अर्ज सादर करणे : १३ मे ते ३ जून

• विभागांमार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी : ९ जून (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

• तात्पुरती गुणवत्ता यादी : १० जून ( सायंकाळी ६ वाजता)

• विद्यार्थी तक्रार : १२ जून (दुपारी १ वाजेपर्यंत)

• पहिली गुणवत्ता यादी : १७ जून (सायंकाळी ६ वाजता)

• ऑनलाईन शुल्क भरणे व प्रवेश निश्चिती : १८ जून ते २१ जून २०२५ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

• द्वितीय गुणवत्ता यादी : २४ जून (सायंकाळी ६ वाजता)

• ऑनलाईन शुल्क भरणे व प्रवेश निश्चिती : २५ जून ते २७ जून (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

• नियमित तासिकांना सुरुवात : १ जुलै