मुंबई : बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र पदविका (डिप्लोमा इन फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीला अखेर तंत्र शिक्षण संचालनालयाने बुधवारपासून सुरुवात केली. विद्यार्थ्यांना २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. या अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी तब्बल एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी २८ ऑगस्टला जाहीर होणार असून अतिम गुणवत्ता यादी ३ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे.
राज्यभरात शासकीय, अनुदानित, विद्यापीठ व्यवस्थापित व खाजगी संस्थांमध्ये असलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदविका (डिप्लोमा इन फार्मसी) जागांसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रे अपलोड, पडताळणी व अर्जाची निश्चिती अशी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. विद्यार्थ्याना यंदाही प्रवेशासाठी ई-पडताळणी व सुविधा केंद्रात जाऊन पडताळणी असे दोन पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत ई-पडताळणी निवडलेल्या उमेदवारांना अर्ज ऑनलाईन भरून कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ही कागदपत्रे संबंधित सहाय्यता केंद्राकडून ऑनलाईन पडताळणीसाठी स्वीकारली जातील. ऑनलाइन सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांनी जवळच्या सुविधा केंद्रामध्ये जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. प्रवेश नोंदणीसाठी सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४००, तर मागास प्रवर्ग, दिव्यांग आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी ३०० रुपये इतके शुल्क आहे.
असे असेल वेळापत्रक
औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंदणी व कागदपत्र अपलोड करता येणार आहे. तसेच २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीमध्ये कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती करायची आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी २८ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असून, या सर्वसाधारण यादीबाबत विद्यार्थ्यांना २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत हरकती नोंदविता येणार आहे. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.