मुंबई; तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रकियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने २ जुलै अखेर अर्ज करण्याची मुदत असणार आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी ४ जुलैला तर अंतिम गुणवत्ता यादी ९ जुलैला जाहीर होणार आहे.
बारावी विज्ञान, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांना आँनलाईन पध्दतीने https://dsd25.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर हे अर्ज सादर करावयाचे आहेत. राज्याबाहेरील विद्यार्थी केवळ संस्थास्तरावरील शेवटच्या समुपदेशन फेरीसाठी पात्र आहेत. प्रत्येक संस्थेत प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जागा थेट द्वितीय वर्षासाठी राखीव असतात. गतवर्षी सुमारे २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यंदाही या प्रवेशासाठी चुरस होण्याची शक्यता आहे. खुल्या गटासाठी ४०० रुपये तर राखीव प्रवर्गाला ३०० रुपये प्रवेश अर्ज शुल्क आहे. राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी पॉलिटेक्निक संस्थांत या प्रक्रियेसाठी अर्ज सुविधा केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोफत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपली मूळ प्रमाणपत्रे याच कालावधीत पडताळणी करुन घ्यायची आहेत.
विद्यार्थ्यांना ३ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत आहे. प्रवेशाची कच्ची गुणवत्ता यादी ४ जुलैला जाहीर होईल. त्यानंतर दोन दिवस हरकती नोंदविण्याची मुदत आहे. ९ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी आणि त्यानंतर महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम नोंदवण्यास सुरूवात होईल.
प्रवेशाचे वेळापत्रक
अर्जाची मुदत : २ जुलैपर्यंत
प्राथमिक गुणवत्ता यादी : ४ जुलै
हरकतीसाठी मुदत : ५ ते ७ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी : ९ जुलै