मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने गेल्या वर्षी १७३ दुकानांचा ई लिलाव केला होता. मात्र या ई लिलावातील दुकनांना प्रतिसाद न मिळाल्याने १७३ पैकी केवळ ४९ दुकानांची विक्री झाली. त्यामुळे आता विक्री न झालेल्या आणि धूळ खात पडून असलेल्या उर्वरित १२४ दुकानांचा पुन्हा ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जुलैच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात या दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे.
मुंबई मंडळाच्या गृहप्रकल्पात रहिवाशांच्या सोयीसाठी काही दुकानेही बांधण्यात येतात. या दुकानांची परवडणाऱ्या दरात ई लिलाव पद्धतीने विक्री करण्यात येते. मुंबई मंडळाने आतापर्यंत शेकडो दुकानांचा ई लिलाव केला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये १७३ दुकानांचा ई लिलाव करण्यात आला होता. प्रतीक्षानगर, तुंगा पवई, गोरेगाव, मालवणी आदी ठिकाणच्या दुकानांचा त्यात समावेश होता. तर ९ मीटर ते २०० मीटरपर्यंतच्या दुकानांसाठी २५ लाख ते १३ कोटी रुपये बोली निश्चित करण्यात आली होती. या ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान १२५ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता होती. मात्र या ई लिलावाला प्रतिसादच मिळाला नाही. एकूण १७३ दुकानांपैकी केवळ ४९ दुकानांनाच प्रतिसाद मिळाला आणि ही दुकाने विकली गेली. तर १२४ दुकाने विक्रीविना पडून राहिली. दुकानांची विक्री न झाल्याने मंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आता पुन्हा या १२४ दुकानांचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार जुलैच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यापर्यंत यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रतीक्षानगर, स्वदेशी मिल, गव्हाणपाडा, मुलुंड, तुंगा पवई, बिंबिसार नगर, गोरेगाव, मालवणी, चारकोप, मागाठाणे, कांदिवली आदी ठिकाणच्या दुकानांचा ई लिलावात समावेश असणार आहे. दरम्यान, या दुकानांच्या किंमती अधिक असल्याने, तसेच दुकानांच्या वापर कशासाठी करायचा याची निश्चित मंडळाकडून करण्यात आल्याने दुकानांना प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते. त्यामुळे किंमतींमध्ये काही बदल करून या दुकानांचा ई लिलाव केला जाणार आहे. तर दुकानांचा वापर बँक, एटीएम, व्यायामशाळा, पिठाची गिरणी आदी वापरासाठीच करणे विजेत्यांना बंधनकारक असते. त्यामुळे ई लिलावास प्रतिसाद मिळत नसल्याने दुकानांच्या वापराबाबतची अट शिथिल करण्याचा विचार सुरू असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय म्हाडा उपाध्यक्षांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. यावेळी नवीन बदलांसह १२४ दुकानांचा ई लिलाव करण्यात येणार असून यावेळी दुकानांना प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मुंबई मंडळाला आहे.