संख्याबळाअभावी सरकार स्थापन करणार नाही, असे भाजपने रविवारी स्पष्ट केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. त्यासाठी शिवसेनेला सोमवारी सायंकाळी साडेसातपर्यंत मुदत देण्यात आली असून, या मुदतीत पक्षाला १४५ आमदारांच्या पािठंब्याचे पत्र सादर करावे लागेल. अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र देणे काँग्रेससाठी अवघड असून, शिवसेनेची कसोटी लागणार आहे.
भाजपने सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचे राज्यपालांना रविवारी कळविले. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला पत्र पाठविले. सोमवारी सायंकाळी ७.३० पर्यंत सरकार स्थापण्याबाबतचा दावा करावा, असे राज्यपालांनी शिवसेनेला कळविले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या सरकारची चर्चा सुरू झाली असली तरी १४५ पेक्षा जास्त आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेनेला सादर करावे लागेल. काँग्रेस आमदारांचा शिवसेना-राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा म्हणून दबाव असला तरी काँग्रेसपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेशी उघडपणे हातमिळवणी केल्यास त्याचे देशात परिणाम भोगावे लागतील. अल्पसंख्यांक समाजाची नाराजी काँग्रेसला परवडणारी नाही, असे पक्षातील काही नेत्यांचे मत आहे. सरकार स्थापण्यासाठी मदतीचा प्रस्ताव शिवसेनेने सादर केल्यास नक्की विचार करू, पण शिवसेनेने आधी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडावे, असा पवित्रा राष्ट्रवादीने घेतला. त्याआधी दुपारी झालेल्या आमदारांच्या बैठकीत युती कायम असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. शिवसेनेला ‘एनडीए’मधून बाहेर पडण्याबरोबरच केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांना राजीनामा द्यावा लागेल. शेजारील कर्नाटकप्रमाणे राज्यात बिगरभाजप सरकार स्थापन करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची योजना मांडली जात असली तरी महाराष्ट्रात हा प्रयोग करण्याचे आव्हान या पक्षांपुढे आहे.
काँग्रेसपुढे पेच
भाजपच्या नकारानंतर मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळणी करावी लागेल, तर हिंदुत्वाचा ठाम पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन काँग्रेसला आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाशी तडजोड करावी लागेल. यातूनच काँग्रेसपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीपुढे सारेच पर्याय नेहमीच खुले असतात. २०१४ मध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. परिणामी शिवसेनेसोबत जाण्यात राष्ट्रवादीला अडचणीचे नाही. काँग्रेसची मात्र दुहेरी कोंडी होऊ शकते. याबाबत काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते सोमवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. ‘पक्षात दोन मतप्रवाह असले तरी वरिष्ठ नेत्यांशी पाठिंब्याबाबत चर्चा केली जाईल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
अद्याप काहीच निर्णय नाही : पटेल
भाजपने सरकार स्थापन करण्यास नकार दिला असला तरी पर्यायी सरकारबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. सेनेची भाजपशी युती अद्यापही आहे. तसेच केंद्रात शिवसेनेचा मंत्रीही आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेना कोणती भूमिका घेते किंवा शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास निर्णय घेऊ, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
स्वाक्षऱ्यांचे पत्र आवश्यक
शिवसेनेला सोमवारी सायंकाळपर्यंत १४५ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करावे लागेल. फार तर शिवसेना मुदत वाढवून देण्याची विनंती राज्यपालांना करू शकते. पण आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र किंवा राजभवनवर १४५ पेक्षा जास्त आमदार राज्यपालांसमोर हजर करावे लागतील. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे एकूण १५४ संख्याबळ होते. काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली तरीही शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ११० संख्याबळ होते. १४५ पेक्षा जास्त आमदारांच्या पािठंब्याचे पत्र असल्याची खात्री झाल्याशिवाय राज्यपाल शिवसेनेला निमंत्रण देणार नाहीत. काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र मिळणे कठीण मानले जाते. शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ आहे, असे खासदार संजय राऊत हे सातत्याने दावा करीत असले तरी प्रत्यक्षात १४५ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करताना त्यांची कसोटी लागणार आहे.
‘शिवसेनेकडून जनादेशाचा अपमान’
राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपकडे विचारणा केली होती. मात्र, दिवसभराच्या चर्चेनंतर भाजपने सरकार स्थापन करण्यास नकार दिला. आमच्याकडे संख्याबळ नाही. महायुती म्हणून लढलो, पण शिवसेनेने जनादेशाचा अपमान केल्याचे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व खापर शिवसेनेवर फोडले. भाजप नेत्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरकार स्थापन करायचे नाही, असा निर्णय घेतला. शिवसेनेची कोंडी करून भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातील मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
‘सेना पालखीचा भोई नाही’
शिवसेना आतापर्यंत पालखीचा भोई होता, पण आता मुख्यमंत्री पदाच्या पालखीत बसेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले. शिवसेना आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलेल्या मालाडच्या ‘रिट्रीट’ हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. भाजपने सत्ता स्थापण्याचा दावा करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा पुनरुच्चार केला. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार का, या प्रश्नावर बोलण्यास राऊत यांनी नकार दिला.
सोनिया गांधी-संजय राऊत आज भेट राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेबाबत पत्र पाठवल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत सोमवारी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटणार आहेत. या भेटीची फलनिष्पत्ती काय होते, यावर सत्तेचे गणित अवलंबून आहे.
