scorecardresearch

“बाबरी पडली तेव्हा मी सुद्धा तिथे होतो, मुंबईवर संकटे येतील तेव्हा…”; मुख्यमंत्र्यांवर दानवेंचा निशाणा

बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे म्हणण्याची कधीही वेळ आली नाही, असेही दानवे म्हणाले

After the Shiv Sena meeting Raosaheb Danve targeted CM Uddhav Thackeray

मुंबईला स्वतंत्र करण्याच्या भाजपा नेत्यांच्या भाषेमुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. मात्र तसा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील, असा इशारा देत भाजपाच्या विकृत-विखारी हिंदुत्वामुळे देशाची दुर्दशा झाल्याची टीका मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केली आहे. त्यानंतर आता भाजपाकडून प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईत माध्यमांशी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

“राज्यातल्या जनतेला या सभेबद्दल उत्सुकता होती. मुख्यमंत्री राज्याला उद्देषून काही बोलणार म्हणून सर्वजण टिव्हीकडे डोळे लावून बसले होते. पण मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकल्यानंतर सर्वांची निराशा झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या तोंडून आम्ही काय करतो आहोत, आम्ही काय करणार आहोत आणि राज्याची सध्याची स्थिती काय आहे अशा प्रकारची वक्तव्ये यायला हवी होती. पण विकासाची चर्चा न करता, राज्यातल्या जनतेला कोणताही दिलासा न देता त्यांनी केवळ भाजपावर तोंडसुख घेण्याचे काम केले आहे,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.

“तुम्ही हिंदुत्व सोडले की नाही याचे प्रमाणपत्र आता देण्याची गरज नाही. पण तुम्ही सांगता की आम्ही हिंदुत्व नाही तर भाजपाला सोडले यावरुनच सिद्ध होते की तुम्ही हिंदुत्व सोडले आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे म्हणण्याची कधीही वेळ आली नाही. ज्या पक्षाने आतापर्यंत शिवसेना भाजपाला शिव्या घातल्या अशा लोकांच्या पंक्तीत तुम्ही जाऊन बसलात याचा अर्थ तुम्ही आता हिंदुत्व सोडलेले आहे. हिंदुत्वाच्या गप्पा सभा घेऊन मारणे आता तुम्ही बंद केले पाहिजे. बाबरी पडली तेव्हा मी सुद्धा तिथे होतो. एकही शिवसैनिक तिथे नव्हता,” असेही दानवे म्हणाले.

“मुंबई तोडण्याची भाषा झाली तेव्हा बलिदान देण्यामध्ये हेच फक्त होते असे थोडी आहे. अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता. मुंबईला तोडण्याचा कोणाचा हेतू नाही. मुंबई अभेद्य राहणार आहे. मुंबईवर जेव्हा संकटे येतील तेव्हा पक्षभेद विसरुन आम्ही सर्व एकत्र येऊ,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After the shiv sena meeting raosaheb danve targeted cm uddhav thackeray abn