मुंबई : कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याने मागील काही वर्षांपासून जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये कृषी अंतर्गत असलेल्या नऊ शाखांच्या जागांमध्ये घट होऊनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला अधिक प्रवेश झाले आहे. तसेच जागा कमी झाल्याने रिक्त जागांचे प्रमाणही घटले आहे.

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या बी.एस्सी कृषी, बी.एस्सी उद्यानविद्या, बी.एस्सी वनविद्या, बी.एफएस्सी मत्स्यशास्त्र, बी.टेक अन्न तंत्रज्ञान, बी.टेक जैवतंत्रज्ञान, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बी.एस्सी सामुदायिक विज्ञान, बीएस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन या नऊ शाखांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मागील काही वर्षांपासून कृषी अभ्यासक्रमाच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहत आहेत.

गतवर्षी कृषीच्या नऊ शाखांसाठी १८ हजार १७७ जागा होत्या. त्यापैकी १३ हजार ६२६ जागांवर प्रवेश झाले. तर ४ हजार ५५१ जागा रिक्त राहिल्या होत्या. दरवर्षी जागा रिक्त राहत असल्याने यंदा आठ महाविद्यालये बंद करण्यात आली. परिणामी, यंदा जागा रिक्त राहण्याचे प्रमाण घटले. यंदा अवघ्या २ हजार ९३७ जागा रिक्त राहिल्या. त्याचवेळी कृषी अभ्यासक्रमाच्या १७ हजार ६६० जागांपैकी १४ हजार ४१७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशामध्येही वाढ झाली आहे.

ही महाविद्यालये झाली बंद

दापोली विद्यापीठाशी संलग्न असलेली चार, तर राहुरी विद्यापीठाशी संलग्न चार महाविद्यालये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांमध्ये बंद करण्यात आली. दापोली विद्यापीठांर्तगत असलेले रत्नागिरीमधील डॉ. बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, मुरबाडमधील उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय त्याचप्रमाणे राहुरी विद्यापीठांतर्गत येत असलेले पुण्यातील वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय, धुळ्यातील कृषी महविद्यालय, अहिल्यानगरमधील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, सोलापूरमधील श्रीराम व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय ही आठ महाविद्यालये विद्यार्थ्यांअभावी बंद करण्यात आली.

बीएस्सी ॲग्रीकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक

गतवर्षीच्या तुलनेत यंदा कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशात वाढ झाली असली तरी यामध्ये बीएस्सी ॲग्रीकल्चर या शाखेला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. गतवर्षी या शाखेला १० हजार १९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यंदा १० हजार ६०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्याखालोखाल बी.टेक अन्न तंत्रज्ञान शाखेला ९०० विद्यार्थ्यांनी, बी.एस्सी उद्यानविद्या शाखेला ८४५ विद्यार्थ्यांनी, तसेच बीएस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन शाखेला ७५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

वर्ष – जागा – प्रवेश – रिक्त जागा

२०२५-२६ – १७६६० – १४४१७ – २९३७

२०२४-२५ – १८१७७ – १३६२६ – ४५५१