मुंबई : कृषी विभागाने आगामी खरीप हंगामात १४४.९७ लाख हेक्टरवर पेरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर गत पाच वर्षांच्या तुलनेत २०४ लाख टन अन्नधान्य, गळीत धान्याचे उद्दिष्टे ठेवले आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्यामुळे पेरणी आणि उत्पादनात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात बियाणांची उपलब्धता चांगली आहे. १४४.९७ लाख हेक्टरसाठी १९ लाख १४ हजार ९४ क्विंटल बियाणांची गरज असून, राज्याकडे २५ लाख ८ हजार ५१९ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या बियाणांच्या टंचाईची शक्यता नाही. १४४.९७ लाख हेक्टरपैकी सर्वाधिक ५०.५ लाख हेक्टरवर सोयाबीन, ४१ लाख हेक्टरवर कापूस आणि १५.२५ लाख हेक्टरवर भात लागवड होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस आणि भाताच्या बियाणांची मागणी जास्त आहे. पावसात खंड पडून दुबार पेरणीची गरज पडली तरीही पुरेसा बियाणांचा साठा असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
यंदाच्या खरिपात २०४ लाख टन अन्नधान्य आणि गळीत धान्यांच्या उत्पादनाचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आले आहे. गत दोन, तीन वर्षांपासून चांगली पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे सरासरी उत्पादनात वाढ होत आहे. गतवर्षी १८७.३० लाख टन उत्पादन झाले होते. त्यामुळे गत पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा जास्त २०४ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे.
रासायनिक खतांची उपलब्धता कमी
राज्याला खरीप हंगामात सरासरी ४५ लाख टन रासायनिक खतांची गरज असते. यंदा केंद्र सरकारने ४६.८२ लाख टन खतांचा कोटा मंजूर केला आहे. त्यात १५.५२ लाख टन युरिया, ४.६० लाख टन डीएपी, १.२० लाख टन एमओपी, १८.०० लाख टन संयुक्त खते, ७.५० लाख टन एसएसपी, असे ४६.८२ लाख टन खते मंजूर असताना, १९ मेअखेर राज्यात फक्त २६.५९ लाख टन खते उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत मंजूर खते उपलब्ध करून देण्याचे आव्हान राज्य सरकार पुढे असणार आहे.