मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) सगळ्याच क्षेत्रांवर गारूड केले असल्याने चित्रपटांसारखे सर्जनशील कलामाध्यमही त्यापासून दूर राहू शकलेले नाही. हॉलिवूडमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा लेखन-दिग्दर्शन अशा विविध सर्जनशील क्षेत्रात अतिवापर करण्याविरोधात आंदोलनही केले गेले, मात्र येत्या काळात चित्रपटनिर्मितीत हे तंत्र अधिकाधिक महत्वाची भूमिका बजावणार आहे, असा सूर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘वेव्हज’ परिषदेतील विविध चर्चासत्रातूनही उमटला.
प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यानेही कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे कलाकाराविना दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे, याकडे लक्ष वेधत तंत्रज्ञानाच्या या युगात कलाकारासाठी त्याचे परकाया प्रवेशाचे कौशल्य महत्त्वाचे ठरणार आहे, असे मत व्यक्त केले. ़
‘वेव्हज’ परिषदेत शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘द आर्ट ऑफ अॅक्टिंग’ या विशेष संवाद कार्यक्रमात अभिनेता आमिर खान याने त्याची अभिनयाची पद्धत, भूमिका उत्तम होण्यासाठी पटकथेपासून अभिनयापर्यंत त्याने विकसित केलेली तंत्रे, त्याचे अभिनय क्षेत्रातील अनुभव अशा विविध गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
आजवर उत्तमोत्तम व्यक्तिरेखा आणि चित्रपट देणाऱ्या आमिर खान याने आपण कुठल्याही प्रकारे अभिनयाचे प्रशिक्षण घेतले नव्हते, अशी कबूली दिली. ‘मी प्रशिक्षित अभिनेता नाही. मला ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शिकण्याची खूप इच्छा होती, पण मी ते करू शकलो नाही. मी काम करता करताच उत्तम अभिनयासाठी छोट्या छोट्या युक्त्या, तंत्रे शिकत गेलो’, असे त्याने सांगितले.
चित्रपटसृष्टीचे भविष्य कसे असेल, या विषयावर बोलताना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा कलाकारांवर कसा प्रभाव पडला आहे याविषयी त्याने माहिती दिली. एखादे दृश्य चित्रित होत असताना संबंधित अभिनेता प्रत्यक्ष उपस्थित नसेल तरी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करत चित्रीकरण पूर्ण होऊ शकते. अभिनेत्यावर झालेले चित्रण नंतर त्या दृश्यचौकटीत टाकून ते दृश्य पूर्ण केले जाते, त्यामुळे इथे कलाकारांचा खरा कस त्यांच्या अभिनय कौशल्यात लागणार आहे. तुम्ही तुमच्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखेच्या मनात कसे शिरता? त्याचा सूर कसा पकडता? यावरून तुमचा प्रभाव पडेल, असे आमिरने सांगितले.
तीनचार महिने संवादलेखन करतो…
भूमिकेची उत्तम तयारी करण्याचे प्रत्येक कलाकाराचे तंत्र वेगळे असते. आमिरची भूमिकेची तयारी पटकथेपासून सुरू होते, असे त्याने सांगितले. ‘मी पटकथेवर खूप वेळ घालवतो. वारंवार पटकथा वाचत राहतो. पटकथा उत्तम असेल तर तुम्हाला तुमच्या व्यक्तिरेखेचा सूर सहज सापडू शकतो. लेखक – दिग्दर्शकाशी केलेल्या चर्चेतून त्याचे अनेक पैलू तुमच्या हाती लागतात’ असे त्याने सांगितले. मात्र, त्याची भूमिकेची तयारी यापेक्षाही अधिक मेहनतीची असते, असे त्याने स्पष्ट केले.
‘माझी स्मरणशक्ती फार चांगली नाही. त्यामुळे पटकथा हातात पडल्यानंतर मी पहिल्या दिवसापासून सगळे संवाद स्वत: हाताने लिहून काढतो. सगळ्यात अवघड संवादांपासून मी सुरूवात करतो. तीन-चार महिने दररोज मी संवाद लिहित जातो, जेणेकरून ते संवाद मला तोंडपाठ होतात. पटकथा तुमच्या हातात पडते तेव्हा ती लेखकाची असते. पण रोज त्यावर तुम्ही काम करत राहता तेव्हा ती तुमची होते’ असे आमिरने सांगितले. चित्रपट क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवोदितांना त्याने तुम्ही प्रामाणिक राहा, असा सल्ला दिला. तुम्ही जितके प्रामाणिक असाल तितके तुमचे सादरीकरण उत्तम होईल, असे त्याने खात्रीपूर्वक सांगितले.