मुंबई : मुंबईची ढासळलेली हवा गुणवत्ता लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रविवार, १९ जानेवारी रोजी होत असलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या मार्गामध्ये एअर क्वालिटी मॉनिटरिंग मोबाइल व्हॅन तैनात करण्याचा निर्णय घेतला असून मॅरेथॉनच्या मार्गात शनिवारी सायंकाळपासून या व्हॅन तैनात करण्यात आल्या. मॅरेथॉन दरम्यान हवेच्या गुणवत्तेचे अचून निरीक्षण करण्यासाठी या व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत.

मागील दोन महिन्यांपासून मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला आहे. यामुळे मुंबई महापालिका, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. दरम्यान, ‘आवाज फाऊंडेशन’ने शुक्रवारी मॅरेथॉनच्या मार्गावरील प्रदूषणाची चाचणी केली होती. या चाचणीमध्ये मॅरेथॉन मार्गावरील पीएम २.५ प्रदूषकांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. ही चाचणी ॲटमॉस सेन्सरआधारित ‘एअर क्वालिटी मीटर’चा वापर करून करण्यात आली होती. सेन्सरआधारित मॉनिटर्सच्या मदतीने अचूक माहिती मिळू शकते. मात्र, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने अचूक, तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी विशिष्ट उपकरणे व पद्धती अनिवार्य केल्या आहेत. यामुळे मंडळाने मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून आठ एअर क्वालिटी मॉनिटरिंग मोबाइल व्हॅन तैनात केल्या आहेत. त्याद्वारे मॅरेथॉन दरम्यान हवेच्या गुणवत्तेचे अचूक निरीक्षण करण्यात येणार आहे.

हेही वाचा…ठाण्यातील कारंज्याच्या प्रदूषित पाण्यातून ११ कासवांची सुटका

मंडळाच्या व्हॅन जसलोक रुग्णालय, वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडंट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लीलावती रुग्णालय, माहीम, शिवाजी पार्क आणि वरळी या परिसरात असणार आहेत. याचबरोबर मॅरेथॉन मार्गावरील रस्त्यांची सफाई करण्याची सूचना मंडळाने पालिकेला केली आहेत. शनिवारी सायंकाळपासून रस्ते साफसफाई करणे आणि बांधकामस्थळी नियमांचे पालन करण्यात येते की नाही याचीही खातरजमा करावी, असेही मंडळाने पालिकेला सूचित केले आहे.

Story img Loader