मुंबई : अर्थमंत्री ठरवतील त्यांना निधी अशा पद्धतीने अर्थखाते चालू शकत नाही. अर्थमंत्रीच जर निधी देणार असतील तर मग, अर्थसंकल्प मांडता तरी कशाला? अर्थसंकल्पातल्या तरतुदींना काही अर्थ आहे की नाही? यापूर्वी कोणी अर्थमंत्री झाले नव्हते काय ? या शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोमवारी विधानसभेत लक्ष्य केले.
पुरवणी मागण्यांवर बोलताना जाधव यांनी वित्त विभागाच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. कोणाला किती निधी द्यायचा याचा लेखाजोखा अर्थसंकल्पात असतो. पण, या सरकारमध्ये कोणत्या मंत्र्याला, कोणत्या विभागाला किती निधी द्यायचा हे अर्थमंत्री ठरवत आहेत. निधी वाटपावरून या सरकारमध्ये आपापसात तक्रारी सुरु आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिल्लीतील नेत्यांकडे अर्थमंत्र्यांच्या विरोधात तक्रारी करीत आहेत, असे जाधव म्हणाले.
रत्नागिरीतल्या आठ तालुक्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. एका गुहागर तालुक्यात नाही. त्यासाठी मी अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र दिले होते. दहा कोटी रुपयांची मागणी त्यामध्ये केली होती. पण अजित पवार यांनी होकार दिला नाही. त्यामुळे मनाला वेदना झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत राजकारण करू नका, असे बजावताना जाधव यांनी वस्तू सेवा कराच्या पैशावर हे महायुतीचे सरकार मस्ती करीत आहे, असा आरोप केला.
दादरला शिवसेना भवनाच्या बाहेर पार्क केलेल्या त्यांच्या मोटारीची टकटक गँगने काच फोडून कागदपत्रे चोरी केली. या घटनेला दीड वर्ष झाले तरी टकटक गँगचा पत्ता लागलेला नाही. बीडमध्ये वाल्मिक कराडचा शोध घेण्यासाठी पथके स्थापन केली. पण वाल्मिक कराड स्वतःहून पोलिसात हजर झाला. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला सरकारने पोलीस पथक नेमले आरोप घरी सापडला. मग ही पोलीस पथके नेमकी करतात काय ?, असा बोचरा सवाल जाधव यांनी केला.