अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता ‘निवड’ केली जावी, अशी दुरुस्ती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटनादुरुस्ती समितीने सूचविली आहे. मात्र, महामंडळाच्या विशेष सभेत घटक संस्थांची त्यावर सहमती झालेली नसल्याने निवडणूक न घेता ‘निवड’ करण्याचे घोडे अद्यापही अडलेले आहेत.

महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक न घेता ‘निवड’ करण्याची सूचना घटनादुरुस्ती समितीकडे केली होती. समितीच्या जून महिन्यात झालेल्या बैठकीत या घटनादुरुस्तीस तत्वत: मान्यता देण्यात आली. मात्र, त्यासाठी बोलाविण्यात आलेल्या महामंडळाच्या विशेष बैठकीत निवडणूक कायम राहिली पाहिजे आणि निवडणूक न घेता ‘निवड’ केली जावी असे दोन गट पडले आणि घटक संस्थांची सहमती न झाल्याने कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नसल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

कोणतीही घटनादुरुस्ती महामंडळाच्या विशेष सभेत २/३ बहुमताने मंजूर व्हावी लागते. येथे दुरुस्ती मंजूर झाली की घटक संस्थांच्या कार्यकारिणीतही ती २/३ बहुमताने मंजूर व्हावी लागते. त्यानंतर ती मान्यतेसाठी धर्मादाय आयुक्तांककडे पाठविली जाते. एकंदरीत ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे घटनादुरुस्ती समितीच्या बैठकीत एक भूमिका आणि महामंडळाच्या विशेष बैठकीत दुसरी भूमिका न घेता या विषयावर सर्व घटक संस्थांची सहमती होणे गरजेचे आहे. तसे झाले तरच संमेलनाध्यक्षाची निवडणूक न होता निवड होऊ शकते, याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले.

  • महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) या घटक संस्थेचे अध्यक्ष प्रा. रावसाहेब कसबे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, निवडणूक न घेता निवड व्हावी असे माझे मत आहे. ‘मसाप-पुणे’सह सर्व घटक संस्थांनी या दुरुस्तीवर आपली सहमती दर्शवावी. मुंबई मराठी साहित्य संघ या घटक संस्थेचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनीही आमची घटक संस्था ‘निवड’ व्हावी या मताची असल्याचे सांगून सर्व घटक संस्थांची या दुरुस्तीवर सहमती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता निवड केली जावी, या घटनादुरुस्तीवर सर्व घटक संस्थांची सहमती होईपर्यंत आहे ती परिस्थिती कायम राहील. घटनादुरुस्तीशी संबंधित कामकाज अद्यापही पूर्ण न झाल्याने संबंधित घटक संस्थांना आपल्या भूमिकेची पुन्हा तपासणी करण्याची संधी कायम आहे.

डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ