मुंबई : कलाकारांच्या मालमत्ता खरेदी – विक्रीसंदर्भात नेहमीच चर्चा रंगत असते. आता भारतीय मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याने गेल्या सात महिन्यात जवळपास ११० कोटी रुपयांची मालमत्ता विकल्याचे समोर आले आहे. त्यात मुंबईतील महत्वाच्या व्यावसायिक केंद्रांपैकी एक असलेल्या वरळी, लोअर परळ आणि बोरिवलीतील काही निवासस्थानांच्या आणि कार्यालयीन मालमत्तांचा समावेश आहे.

दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुसंख्य कलाकारांनी कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केलेली असताना मुंबई रिअल इस्टेट अपडेटनुसार, अक्षय कुमार याने गेल्या सात महिन्यात जवळपास ११० कोटी रुपयांच्या मालमत्तेची विक्री केली आहे. विशेष बाब म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कर भरणाऱ्या पहिल्या पाच कलाकारांमध्ये अक्षय कुमारचा समावेश आहे. त्यामुळे आता अक्षय कुमारने अचानकपणे तब्बल ११० कोटी रुपयांच्या मालमत्तेची विक्री का केली? अशा प्रश्न चर्चिला जात आहे.

अक्षय कुमारने कोणत्या ठिकाणची मालमत्ता किती रुपयांना विकली?

१) अक्षय कुमारने २०१७ साली बोरिवली येथे २ कोटी ३८ लाख रुपयांना खरेदी केलेली १०७३ चौरस फूट आकारमानाची सदनिका

४ कोटी २५ लाख रुपयांना विकली. आता या विक्रीद्वारे त्यांना ७८ टक्के नफा झालेला आहे.

२) वरळीतील ‘ओबेरॉय थ्री सिक्टी’ या गगनचुंबी इमारतीमध्ये असलेली ६८३० चौरस फूट आकारमानाची आलिशान सदनिका त्यांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी ८० कोटी रुपयांना विकली आहे.

३) बोरिवली (पूर्व) येथील १०७३ चौरस फुटांच्या तीन बीएचके सदनिकेची विक्री मार्च महिन्यात ४ कोटी ३५ लाख रुपयांना करून ८४ टक्के नफा झाला आहे.

४) बोरिवली येथे २०१७ साली खरेदी केलेल्या एका सदनिकेची विक्री ६ कोटी ६० लाख रुपयांना करून ८९ टक्के नफा झाला आहे.

५) लोअर परळ येथे २०२० साली ४ कोटी ८५ लाख रुपयांना खरेदी केलेल्या कार्यालयाची एप्रिल महिन्यात ८ कोटी रुपयांना विक्री करण्यात आली आहे.

६) बोरिवली येथे २०१७ साली ३ कोटी ६९ लाख रुपयांना खरेदी केलेल्या तीन बीएचके सदनिकेची १६ जुलै रोजी ७ कोटी १० लाख रुपयांना विक्री करण्यात आली आहे.