मुंबई : प्रसिध्द अभिनेत्री आलिया भट्टची माजी वैयक्तिक सचिव (पर्सनल सेक्रेटरी) वेदिका शेट्टीने अपहार केलेले ७७ लाख रुपये महागड्या वस्तूंची खरेदी आणि मेजवानीसाठी उधळल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. जुहू पोलिसांनी शेट्टीला बंगळून येथून अटक केली आहे.वेदिका शेट्टी (३२) अंधेरी पूर्व येथील मरोळ परिसरात वास्तव्यास आहे. ती अभिनेत्री आलिया भट्टची वैयक्तिक सचिव (पर्सनल सेक्रेटरी) आणि कार्यालयीन कामांसाठी सल्लागार म्हणून काम करीत होती. तिला दरमहा ४० हजार रुपये वेतन देण्यात येत होते. ती आलिया भट्ट आणि तिची आई संचालिका असलेल्या ईटर्नल सनशाईन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे, तसेच भट्ट कुटुंबाचे वैयक्तिक आणि प्रशासकीय कामकाज पाहात होती. यामध्ये वेळापत्रक ठरवणे, प्रवासाचे नियोजन, सुरक्षा समन्वय, घरगुती कर्मचारी व्यवस्थापन, धनादेश तयार करणे आणि ग्राहकांशी समन्वय साधणे या कामांचा समावेश होता.
७७ लाखांचा अपहार
वेदिका शेट्टीने काम करताना कंपनीचे काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि गोपनीय माहिती बेकायदेशीरपणे मिळवली. यामध्ये संहिता (स्क्रिप्ट्स) प्रॉडक्शन शेड्युल (वेळापत्रक), भट्ट कुटुंबियांच्या प्रवासाचे तपशील आणि संवेदनशील करार आदींचा समावेश होता. ही माहिती ती बाहेरील व्यक्तींना देत असल्याचे निदर्शनास आले. शेट्टीने बनावट बिले तयार करून ती खरी असल्याचे भासवले. त्याआधारे धनादेश तयार करून कंपनी व संचालिका, आलिया भट्ट यांच्या खात्यातून पैसे अन्य खात्यात वळते (ट्रान्सफर) केले. पुढे हे पैसे तिने स्वतःच्या खात्यात वळते करून घेतले. मे २०२२ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत तिने ७७ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे आढळून आले. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर प्रकरणी संचालिका आणि आलिया भट्टची आई सोनी रझदान यांनी जुहू पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार २३ जानेवारी २०२५ रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) आणि ३१६ (४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
पाच महिन्यांनी अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर वेदिका शेट्टी आपल्या मूळ गावी मंगळूर येथे आणि नंतर राजस्थानमध्ये गेली होती. तिने मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर ती बंगळूर येथील बहिणीच्या घरी जाऊन लपली होती. पोलिसांनी तिचा शोध घेऊन मंगळवारी अटक केली.
मेजवानी आणि महागड्या वस्तूंची खरेदी
वेदिका शेट्टीने कंपनीच्या खात्यातून किमान पाच जणांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले होते. या पैशांतून तिने अनेक महागड्या वस्तू, आयफोन आणि आयपॅड खरेदी केले होते. उर्वरित रक्कम तिने मेजवानी (पार्ट्या) आणि महागड्या वस्तूंच्या खरेदीवर खर्च केल्याचे तिने पोलीस चौकशीत सांगितले. त्यामुळे हे पैसे पोलिसांना मिळवता आले नाहीत. शेट्टीचे बँक खाते, तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट तपासण्यात येत आहेत. त्यावरून तिने केलेल्या खर्चाचा नेमका तपशील मिळवता येईल.
एकदा समज दिली होती
कंपनीला ऑक्टोबर २०२२ मध्ये विक्रेत्यांकडून आलेल्या भेटवस्तू आणि गिफ्ट कार्ड्सचा शेट्टीने गैरवापर केल्याचे उघड झाले होते. त्याबाबत विचारणा केली असता तिने आपली चूक मान्य करून माफी मागितली होती. तिचे वय लक्षात घेऊन त्यावेळी कंपनीने आणि आलिया भट्टने तिच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. तिने पुन्हा अशी चूक न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तिने पुन्हा फसवणूक केली, असे पोलिसांनी सांगितले.