मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून मान्यता मिळालेल्या आठ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागांचा समावेश तिसऱ्या फेरीमध्ये करण्यात आला होता. मात्र, एका फेरीमध्येच या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा भरल्या असून, फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच जागा शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे, मुक्त फेरीसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी आता अधिक चुरस असेल.

राज्यातील अंबरनाथ, अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली, जालना हिंगोली, बुलढाणा आणि भंडारा या आठ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून प्रत्येकी १०० जागांना मान्यता मिळाली होती. या महाविद्यालयातील जागा २०२४-२५ या शैक्षिणक वर्षामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, १०० जागांपैकी १५ टक्के जागा केंद्रीय कोट्यातून, तर ८५ टक्के जागा राज्य कोट्यातून भरल्या जातात. त्यानुसार, या आठही महाविद्यालयांतील ६८० जागा राज्य कोट्यासाठी उपलब्ध झाल्या होत्या. या सर्व जागांचा समावेश वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीमध्ये करण्यात आला होता.

आणखी वाचा-बाणगंगा महोत्सवासारख्या कार्यक्रमांचा मतदान जनजागृतीसाठी विचार करावा, अश्विनी जोशी यांच्या सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाईन मुक्त फेरीसाठी २८२ जागा उपलब्ध

नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या फेरीनंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाईन मुक्त फेरीसाठी २८२ जागा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये ४१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३० जागा रिक्त राहिल्या असून त्यात नव्या आठ वैद्यकीय महाविद्यालयातील १७ जागांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील २३ खासगी वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातील २५२ जागा रिक्त राहिल्या आहेत. ऑनलाईन मुक्त फेरीच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना २९ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.