कुलदीप घायवट

मुंबई : अतिजलद रेल्वेच्या नावाखाली रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची खुलेआम लूट चालवल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. अतिजलद रेल्वे गाडय़ांना अधिभार लावून तो प्रवाशांकडून आकारला जातो. मात्र अतिजलद गाडीचा वेग किमान ५५ किमी प्रतितास असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र गाडीचा वेग कमी असतो. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे, दक्षिण रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे आणि उत्तर पश्चिम रेल्वे या सहा विभागांच्या ३२ रेल्वेगाडय़ा अतिजलद नसतानाही प्रवाशांकडून अतिजलदचे शुल्क आकारले जात आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या नियमानुसार किमान ताशी ५५ किमी किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाडय़ांना ‘अतिजलद’चा दर्जा दिला जातो. या रेल्वेगाडीतून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशामागे तिकिटदरात एक्झिक्युटिव्ह वातानुकूलित, विस्टाडोम डबा आणि प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यांसाठी ७५ रुपये अतिजलद अधिभार आकारला जातो. वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबा, वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा आणि वातानुकूलित चेअर कार डब्यासाठी ४५ रुपये, द्वितीय श्रेणी डब्यासाठी १५ रुपये असे शुल्क आकारण्यात येते. मात्र, १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू केले आहे. पावसाळय़ात कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या गाडय़ा अतिजलद निकषाची पूर्तता करत नाहीत; परंतु अतिजलद अधिभार मात्र प्रवाशांकडून घेतला जातो.  ‘अतिजलद’ रेल्वेगाडय़ांच्या शुल्काबाबत रेल्वे मंडळ पातळीवर निर्णय घेतला जातो, असे मध्य रेल्वेने सांगितले.

पश्चिम रेल्वे

२०९३१/२०९३२ कोचुवेली इंदूर एक्स्प्रेस, २०९०९/२०९१० कोचुवेली पोरबंदर एक्स्प्रेस, २०९२३/२०९२४ तिरुनेलवेली गांधीधाम हमसफर एक्स्प्रेस

कोकण रेल्वे

२०१११/२०११२ कोकणकन्या एक्स्प्रेस

दक्षिण रेल्वे

२२६२९/२२६३० दादर तिरुनेलवेली विशेष एक्स्प्रेस, १२६१९/१२६२० मत्स्यगंधा फेस्टिव्हल विशेष एक्स्प्रेस, १२२०१/१२२०२ गरीबरथ विशेष एक्स्प्रेस,

पश्चिम मध्य रेल्वे

०२१९७/०२१९८ कोयम्बटूर-जबलपुर विशेष एक्स्प्रेस

उत्तर पश्चिम रेल्वे

२२४७५/२२४७६ हिसार-कोयंबटूर एसी विशेष एक्स्प्रेस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे प्रशासनाचे म्हणणे काय?

  • पश्चिम रेल्वेवरील दोन्ही दिशांकडील धावणाऱ्या अतिजलद रेल्वेगाडय़ा सर्व निकषांचे पालन करत आहेत, असा दावा पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी केला आहे.
  • पावसाळय़ात फक्त दोन ते तीन महिन्यांसाठी तिकीट भाडय़ात का बदल करायचा? त्यामुळे एकच तिकीट भाडे प्रणाली कायम ठेवली आहे, असे कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अतिजलद रेल्वेगाडय़ांच्या वेगाबाबत लक्ष देण्यात येईल, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी सांगितले.

कोकण रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी याआधीच ४० टक्के अधिभार घेतला जातो. यात ३२ रेल्वेगाडय़ा अतिजलद नसताना रेल्वे प्रशासन अतिजलद शुल्क आकारून प्रवाशांकडून अतिरिक्त रक्कम घेत आहे. याप्रकरणी पाठपुरावा करून कोकणवासीयांची होणारी लूट थांबवण्यात येईल.  – विनायक राऊत,खासदार