उमाकांत देशपांडे
भाजप-शिवसेनेकडून उमेदवार परस्परांना बहाल; सोयीसाठी पक्षांतरे
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जागा काहीही करून जिंकायचीच, हे उद्दिष्ट ठेवून जागावाटपात भाजप-शिवसेना कोणत्या जागा लढविणार हे ठरले असतानाही उमेदवारांची देवाण-घेवाण भाजप-शिवसेनेने केली आहे.
भाजपने नांदेडमधून शिवसेना आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेने भाजप खासदार डॉ. राजेंद्र गावीत यांना पालघरमधून आपल्या चिन्हावर उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या माजी आमदार नरेंद्र पाटील यांचा रविवारी शिवसेनेत प्रवेश होऊन त्यांना सातारा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अन्य पक्षातून आलेल्या किंवा भाजप सदस्य नसलेल्या चार उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
भाजपने लोकसभेसाठी २५, तर शिवसेनेने २३ जागा लढविण्याचे सूत्र युतीमध्ये ठरले आहे. पण तरीही प्रत्येक मतदारसंघात कोण जिंकून येऊ शकतो, याचे सर्वेक्षण करून उमेदवारांची देवाणघेवाण करण्याच्या पर्यायावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून हा मार्ग अवलंबिला, असे ज्येष्ठ भाजप नेत्यांनी सांगितले. पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. वनगा यांचा मुलगा श्रीनिवास याला शिवसेनेने उमेदवारी दिली आणि भाजपने काँग्रेसमधून डॉ राजेंद्र गावीत यांना पक्षात आणून विजय मिळविला. युतीच्या जागावाटपात पालघरचा आग्रह शिवसेनेने धरल्याने भाजपने तो मान्य केला. मात्र भाजपने आपलेच खासदार गावीत यांना शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवारी दिली आहे. वनगा यांना भाजपच्या कोटय़ातून विधान परिषदेच्या उमेदवारीचे आश्वासन देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात भाजपने शिवसेनेचे आमदार चिखलीकर यांची निवड केली. निवडणूक काळात आयाराम-गयारामची प्रथा जुनी असली तरी उमेदवारांच्या देवाणघेवाणीचे प्रयोग मात्र फारसे केले जात नाहीत. पण या निवडणुकीत उभयपक्षी समझोता करून हे साध्य केल्याचे ज्येष्ठ भाजप नेत्याने स्पष्ट केले.
भाजपने खासदार दिलीप गांधी यांना तिकीट नाकारून ज्येष्ठ काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय यांना उमेदवारी दिली. तर दिंडोरीतून हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी नाकारून राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या भारती पवार यांना उमेदवारी दिली. काँग्रेसमधून आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढय़ातून उमेदवारी मिळाली आहे.
