अण्णा हजारेंच्या तोंडाला पाने पुसली
आरोग्यासाठी विदेशी वा देशी मद्य आवश्यक आहे, असा डॉक्टरांचा हवाला हाती असलेल्या अर्जदारास मद्याच्या दोनऐवजी १२ बाटल्या बाळगण्याची मुभा देण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आग्रहामुळे मद्याच्या १२ बाटल्या बाळगण्याची मुभा कमी करून दोन बाटल्यांपर्यंतचाच परवाना जारी करण्याचा निर्णय काँग्रेस आघाडी सरकारने घेतला होता; परंतु भाजप-शिवसेना सरकारने हा निर्णय घेतला.
याबाबतचे परिपत्रक ऑक्टोबरमध्यचे जारी झाले होते, पण उत्पादन शुल्क विभागाने लगेचच त्याचा गवगवा केला नाही. याबाबत प्रसिद्धी केली गेली तर त्याचा फायद्यासाठी गैरवापर होईल, अशीही शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने आता नव्याने जारी केलेल्या मद्य परवान्याच्या मसुद्यात हा बदल समाविष्ट केला आहे. या बदलाची प्रत्यक्षात फारच कमी ग्राहकांना कल्पना आहे.
चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्य़ात दारूबंदी असल्यामुळे त्याचा उल्लेख करून या नव्या परवान्यात ग्राहकांना १२ युनिट (एक युनिट म्हणजे ७५० मिली विदेशी वा देशी मद्य, १५०० मिली वाईन किंवा २६०० मिली बीअर) बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिन्यात भाजप-सेना शासनाने हा निर्णय घेतला. त्याबाबतची अधिकृत अधिसूचनाही जारी करण्यात आली. जुन्या पद्धतीने जारी झालेल्या परवान्यावर दोन युनिटचा उल्लेख होता. त्याऐवजी आता १२ युनिट असा उल्लेख करण्यात आला आहे. सुरुवातीपासूनच मद्यपरवान्यात विदेशी व देशी मद्य बाळगण्यासाठी वा सेवनासाठी १२ युनिट असा उल्लेख होता. परंतु ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन केल्यामुळे तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने १२ वरून दोन युनिट असा बदल करून तो प्रत्यक्षात अमलातही आणला होता.
मद्य परवाना न बाळगणाऱ्यांना मुंबई प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागू शकते किंवा प्रसंगी तुरुंगवासही होऊ शकतो. (मद्यपरवाना नसलेल्या मद्यपि चालकांना तुरुंगवास झाला आहे)