मुंबई : आंबेडकरी विचारांवर आधारित ‘कवन’ या हिंदी नाटकाचे प्रयोग १ आणि २ ऑगस्ट दरम्यान पृथ्वी थिएटर येथे होणार आहेत. आजवर गावागावातून किंवा शहरांत होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून आंबेडकरी शाहिरी जलशाच्या माध्यमातून जातीपातीविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आम्हा कलावंतांना पहिल्यांदाच पृथ्वी थिएटरच्या भिन्न आर्थिक – सामाजिक स्तरातून आलेल्या प्रेक्षकांसमोर नाट्यरुपात आंबेडकरी विचार मानण्याची संधी मिळाली आहे, असे मत ‘कवन’चे सहनिर्माते असलेल्या ‘यल्गार सांस्कृतिक कलामंच’च्या धम्मरक्षित रणदिवे यांनी व्यक्त केले.

गावागावातून पथनाट्य, लोकसंगीताचा आधार घेत केलेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम ‘यल्गार सांस्कृतिक कलामंच’च्या माध्यमातून काही तरुण कलाकार करत आहेत. गेली चार वर्ष ‘आम्ही आंबेडकर शाहिरी जलशाच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत. आम्ही सादर करत असलेला कार्यक्रम लेखक – दिग्दर्शक अभिषेक मजुमदार यांनी पाहिला. अभिषेक यांनी हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषेतील नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. आंबेडकर शाहिरी जलशाचाच आधार घेत एक संगीतमय नाटक करण्याची कल्पना अभिषेक यांनी आमच्यासमोर मांडली. त्यावर आम्ही काम करत गेलो. आमच्याच मंचाचा कलाकार असलेल्या सुदेश जाधव याने हिंंदीत कथा लिहिली. मग त्यानुसार आम्ही हिंदीत गाणी तयार केली, रंगकर्मी इरावती कर्णिक यांनी नाट्यस्वरुपात कथा बसवण्यासाठी सहकार्य केले आणि अभिषेक मजुमदार यांच्या दिग्दर्शनाखाली आंबेडकरी ऑपेरा सादर करणारे ‘कवन’ हे नाटक तयार झाले’, अशी माहिती धम्मरक्षित यांनी दिली.

नालंदा आर्ट्स स्टुडिओ आणि यल्गार सांस्कृतिक कलामंच यांची निर्मिती असलेल्या ‘कवन’ या हिंदी नाटकाचे प्रयोग पहिल्यांदाच १ आणि २ ऑगस्ट दरम्यान पृथ्वी थिएटर येथे होणार आहेत. १ ऑगस्टला रात्री ८ वाजता, तर २ ऑगस्टला संध्याकाळी ४ वाजता आणि रात्री आठ वाजता असे या नाटकाचे तीन प्रयोग होणार आहेत. पृथ्वी थिएटर हे आता मुख्य प्रवाहातील हिंदी, इंग्रजी तसेच मराठी भाषिक नाटकांचेही केंद्रबिंदू झाले आहे. त्यामुळे पृथ्वीसारख्या ठिकाणी विविध भाषिक नाट्यप्रेमी प्रेक्षकांसमोर संगीतमय नाट्यरुपात आंबेडकरी विचार मांडण्याची संधी आम्हाला कलाकार म्हणून महत्त्वाची वाटते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या धर्म आणि जातीव्यवस्थेवरून समाजात थेट हिंसाचार बोकाळला आहे. याविषयी, सुसंवाद साधण्याऐवजी हिंसाचाराची भाषा सातत्याने केली जाते. अशा वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात समता निर्माण व्हावी याविषयी मांडलेले विचार, संविधानामागची त्यांची भूमिका, अभ्यास आणि मानवतावादी दृष्टिकोन समाजापर्यंत विशेषत: तरुणांपर्यंत पोहोचवणे गरजेचे झाले आहे. एक कलाकार आणि नागरिक म्हणून व्यवस्थेला प्रश्न विचारणे ही आमची जबाबदारी आहे आणि ‘कवन’च्या माध्यमातून सरकारला, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही धम्मरक्षित यांनी सांगितले.