मुंबई : मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात उत्पादित होणारा आणि गणेशोत्सवात मोदकासाठी वापरला जाणारा आंबेमोहोर या सुगंधी तांदळाच्या दराने आजवरचा उच्चांकी दर गाठला आहे. आंबेमोहोर तांदूळ किरकोळ बाजारात दोनशे रुपये किलोवर गेला आहे. घाऊक बाजारात १७० ते १८० रुपये किलो दर झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोदकासाठी आंबेमोहोर तांदळाला मागणी वाढल्यामुळे तांदळाचा तुटवडा जाणवत आहे. डिसेंबर अखेरीस नवा तांदूळ बाजारात येईपर्यंत चढेच राहण्याचा अंदाज तांदळाच्या व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

सुगंधी तांदूळ म्हणून आंबेमोहोर जग प्रसिद्ध आहे. राज्यात साधारण गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी मोदक बनवण्यासाठी सुगंधी आंबेमोहोर तांदळाला मागणी वाढते. नेमक्या याच काळात आंबेमोहोर तांदळाचा दर किरकोळ बाजारात दोनशे रुपये किलोवर पोहोचला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशात आंबेमोहोर तांदूळ उत्पादित होतो. हा तांदूळ डिसेंबर अखेरीस बाजारात येतो, तोपर्यंत तांदळाचे दर दोनशे रुपयांपर्यंत टिकून राहतील असा अंदाज आहे.

गतवर्षी आंबेमोहोर तांदूळ बाजारात आला, त्यावेळेला साधारणतः ६० ते ७० रुपये किलो, असा तांदळाचा दर होता. पण गतवर्षी आंबेमोहोर तांदूळ उत्पादित करणाऱ्या प्रमुख तीन राज्यांमध्ये उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे आंबेमोहर तांदळाचा पहिल्यापासून काहीसा तुटवडा जाणवत होता. आंबेमोहोर खाणारा ग्राहक हा आंबेमोहोर तांदळालाच पसंती देतो, तो अन्य तांदळाचा वापर करत नाही. अगदी अमेरिकेतही आंबेमोहोर तांदळाचा ग्राहक वर्ग ठरलेला आहे आणि तो भारतातूनच आंबेमोहोर तांदळाची आयात करतो. मर्यादित उत्पादन आणि हक्काचा ग्राहक या तांदळाला मिळत असल्यामुळे तांदळाचे दर कायम चढेच राहिले आहेत. या वर्षी सुद्धा आंबेमोहर तांदळाच्या उत्पादनात काहीशी घटच होण्याचा अंदाज आहे. शिवाय, हा तांदूळ डिसेंबरच्या अखेरीस बाजारात येईल तोपर्यंत चढ्या दरानेच ग्राहकांना आंबेमोहोर तांदूळ विकत घ्यावा लागणार आहे.

अशी झाली दरात वाढ

गतवर्षी म्हणजे २०२४ च्या डिसेंबरमध्ये आंबेमोहोर तांदूळ बाजारात आला. त्या वेळेला बाजारात सरासरी ६० ते ६५ रुपये किलो दर किरकोळ बाजारात होता. त्यातही राज्यनिहाय विचार करता महाराष्ट्रात ६० ते ६५ रुपये, आंध्र प्रदेशात ७० ते ७५ रुपये आणि मध्य प्रदेशात ८० रुपये किलोपर्यंत आंबेमोहर तांदळाचा दर होता. गतवर्षी आंबेमोहरचे उत्पादन घटले होते. दुसरीकडे देशांतर्गत घरगुती वापर आणि निर्यात सरासरी इतकीच राहिली आहे. त्यामुळे तांदळाचा तुटवडा जाणू लागला आहे. साधारण बासमती तांदळाच्या निम्मा दर आंबेमोराला असतो. बासमती तांदूळ बाजारात १०० ते १२० रुपये किलो आहे, त्यामुळे आंबेमोहर तांदूळ सरासरी ६० ते ८० रुपयाच्या घरामध्ये असायला पाहिजे होता, तो २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. आंबेमोहोर तांदळाच्या किंवा एकूण तांदळाच्या इतिहासातील हा आजवरचा विक्रमी दर आहे.

आंबेमोहर तांदळाचे उत्पादन प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आणि आंध्र प्रदेशात होते. गतवर्षी तांदळाचे उत्पादन सरासरीपेक्षा कमी झाले होते. तरीही देशांतर्गत घरगुती वापर, निर्यात कायम राहिली. गणेशोत्सवाच्या काळात तांदळाला मागणी वाढते. पण, तांदळाचा तुटवडा आणि वाढलेल्या मागणीमुळे किरकोळ बाजारात आंबेमोहोर तांदूळ दोनशे रुपये किलोपर्यंत गेला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत तांदळाचे दर चढेच राहतील, असा अंदाज आहे. – जयराज शहा, तांदळाचे निर्यातदार