मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदेश भाजपच्या नेत्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकीत विजयासाठी कानमंत्र दिला. कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपचा महापौर निवडून आला पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना शहा यांनी दिल्या.
शहा यांनी आपल्या दोन दिवसांच्या मुंबई भेटीत लालबागचा राजा, मंत्री आशीष शेलार यांच्या सार्वजनिक मंडळाचा गणपती व अंधेरीचा महाराजा यांचे दर्शन घेतले. या भेटीत शहा यांनी प्रदेश व मुंबईच्या निवडक नेत्यांशी आगामी निवडणुकीच्या संघटनात्मक तयारीची चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी नेते या बैठकीस उपस्थित होते.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर असून मुंबईसह राज्यात जेथे शक्य होईल, तेथे युतीत निवडणूक लढवावी, मात्र महापौरपद व सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष भाजपच असावा, या दृष्टीने जागावाटप व रणनीती निश्चित करा, अशा सूचना शहा यांनी प्रदेश व मुंबईच्या नेत्यांना दिल्या. मुंबई महापालिकेतील शिवसेनेची (उद्धव ठाकरे) सत्ता उलथून टाकून भाजपचा महापौर सत्तेवर येण्यासाठी कोणती रणनीती आखावी, संघटनात्मक तयारी कशा प्रकारे करावी, आदी मुद्द्यांवर शहा यांनी मार्गदर्शन केले.
एकनाथ शिंदेंची शहा यांच्याशी चर्चा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहा यांची स्वतंत्र भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये काम करीत असताना येत असलेल्या अडचणी किंवा होत असलेली कोंडी, रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा पेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील जागावाटपाचे प्रश्न आदी मुद्द्यांवर चर्चा केल्याचे समजते.
विमानात तांत्रिक बिघाड
गणरायाचे दर्शन घेऊन गुजरातला जाण्यासाठी निघालेल्या अमित शहा यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी राखीव असलेल्या विमानातून ते सहकुटुंब गुजरातला रवाना झाले.