मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचलनामुळे आकर्षण बनलेला ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या सतराव्या पर्वाचा प्रोमो समोर आला आहे. महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा सूत्रसंचालन करताना दिसणार असून ‘जहां अकल है, वहां अकड है’ असे म्हणत पहिलीवहिली झलक समोर आली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’चे सतरावे पर्व ११ ऑगस्टपासून सुरू होत असून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता ‘सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन’ वाहिनीवर आणि ‘सोनी लिव्ह’ या ओटीटी माध्यमावर कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.
अमिताभ बच्चन यांची सूत्रसंचालन करण्याची अनोखी शैली, भारदस्त आवाज आणि स्पर्धकांशी साधलेला अनोख्या संवादामुळे ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. प्रश्नमंजुषेवर आधारित असणारा हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती’चे सूत्रसंचालन करीत आहेत, मात्र हा कार्यक्रम अमिताभ बच्चन सोडणार आणि नवीन व्यक्ती सूत्रसंचालन करताना दिसणार, अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. परंतु आता ‘सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन’ वाहिनीने अधिकृत समाजमाध्यम खात्यावर ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या सतराव्या पर्वाचा प्रोमो सादर केला आहे आणि त्यामध्ये अमिताभ बच्चन ‘जहां अकल है, वहां अकड है’ असे म्हणताना दिसत आहेत, त्यामुळे सतराव्या पर्वात अमिताभ बच्चनच सूत्रसंचालन करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान, भारतीय टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध ‘कौन बनेगा करोडपती’ हा हिंदी कार्यक्रम यूकेतील प्रसिद्ध ‘हू वॉन्टस टू बी मिलेनिअर’ या कार्यक्रमापासून प्रेरित आहे. हा कार्यक्रम भारतात २००० साली सुरू झाला होता. प्रश्नमंजुषेवर आधारित असणारा हा कार्यक्रम अल्पावधीतच घराघरात पोहोचला. या कार्यक्रमात सर्वसामान्य नागरिकांपासून विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी होतात. तर विजेत्यांना कोट्यवधींची बक्षिसे देण्यात येतात. आता सतराव्या पर्वाचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून यंदाच्या पर्वात नेमके वेगळे काय असणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.