मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना ‘नाफा’ जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशनतर्फे अमेरिकेतील सॅन होजेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘नाफा ग्लॅमरस फिल्म अवार्ड नाईट’ या सोहळ्यात पालेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यंदा हॉलिवुडच्या धर्तीवर नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनतर्फे सॅनहोजे येथे २५, २६ आणि २७ जुलै या कालावधीत दुसऱ्या ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये झालेल्या ‘नाफा ग्लॅमरस फिल्म अवार्ड नाईट’ या सोहळ्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार आणि ‘नाफा’चे संस्थापक अभिजीत घोलप यांच्यासह मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंत व प्रेक्षक उपस्थित होते.
‘काही वर्षांपूर्वी गौरी देशपांडे यांच्या कथेवर आधारित चित्रपट करण्याची तयारी मी सुरू केली होती. निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन या दोघांना घेऊन मराठी चित्रपट बनविण्याचे माझे स्वप्न होते. निकोलने पटकथा आवडल्याने तात्काळ होकार दिला. मात्र हॉलिवूडमधील कोणत्याही एका स्टुडिओला सोबत घेण्याची अट घातली. या किचकट गोष्टीची कल्पना असल्याने तो विचार मी सोडून दिला. पण आता ‘नाफा’माध्यमातून अशी स्वप्ने पूर्ण होतील’, अशी आशा अमोल पालेकर यांनी व्यक्त केली.