मुंबई: सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत तस्करांना मदत करणाऱ्या विमानतळ कर्मचाऱ्याला मंगळवारी अटक करण्यात आली. आरोपीकडून ३३ सोन्याचे लगड जप्त करण्यात आले असून त्याचे वजन सुमारे पावणेचार किलो आहे. याप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सव्वादोन कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी कर्मचाऱ्याने गेल्या १५ दिवसांमध्ये किमान १० वेळा सोन्याच्या तस्करीत मदत केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

सीमाशुल्क विभागाने संशयाच्या आधारावर विमानतळार काम करणाऱ्या अक्षय कुळे याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे काळ्या रंगाच्या पाकिटामध्ये काही वस्तू सापडली. ते पाकिट पाहिले असता त्यात दोन मोबाइल कव्हरमध्ये अनुक्रमे १७ व १६ पिवळ्या रंगाचे धातू साडले. तपासणीत ते सोने असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी कुळे याच्याकडे सोन्याच्या एकूण ३३ लगड सापडल्या असून त्याचे वजन तीन हजार ८४५ ग्रॅम आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत दोन कोटी १४ लाख रुपये आहे. याप्रकरणी सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अक्षयला अटक करण्यात आली.

हेही वाचा… वर्षाअखेरीस मुंबई-जालना वंदे भारत सुरू होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी विरार पूर्व येथील मनवेलपाडा परिसरातील रहिवासी आहे. चौकशीत आरोपीने १५ दिवसांमध्ये किमान १० वेळा अशा पद्धतीने सोन्याच्या तस्करीत मदत केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय आहे. याप्रकरणामध्ये अन्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे का? याबाबत सीमाशुल्क विभाग तपास करीत आहे. तसेच आरोपी विमानतळावर कोणकोणत्या विभागात कार्यरत होता, याबाबतची माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.