लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि ‘रिपब्लिकन सेने’चे संस्थापक-अध्यक्ष आंनदराज आंबेडकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेबरोबर (शिंदे) युती केली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात बुधवारी दोघा नेत्यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली.कुठल्याही अटींशिवाय आम्ही युती केली, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. आमची युती विचारांची आणि विश्वासांची असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
आघाडी सरकारच्या काळात २०११ मधील ‘इंदु मिल’ आंदोलनातून आनंदराज यांचे नेतृत्व पुढे आले आहे. बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून मुंबई आणि कोकणात आनंदराज यांनी बौद्ध जनतेचे संघटन बांधलेले आहे. सध्या ते ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’चे विश्वस्त आहेत. रिपब्लिकन सेनेचे मुंबईत विशेष संघटन नाही, त्यामुळे शिवसेनेला या युतीचा कितपत लाभ होईल, याविषी शंका आहेत.
आनंदराज यांचे मोठे बंधु ॲड. प्रकाश आंबेडकर यांची ‘वंचित बहुजन आघाडी’ हा राजकीय पक्ष आहे. आनंदाज यांनी अमरावतीमधून २०२४ ची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढविली होती. शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर ‘रिपाइं’ नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांची युती असून कवाडे यांच्या पुत्राची महामंडळाच्या अध्यक्षपदी सेनेच्या कोट्यातून वर्णी लावलेली आहे. ‘रिपाइं नेते रामदास आठवले हे भाजपसोबत असून प्रा. अर्जुन डांगळे हे उद्धव सेनेबरोबर आहेत.
आंबेडकरी जनतेशी विश्वासघात
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडून या युतीवर प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे. ‘सदर युती म्हणजे फुले-शाहू- आंबेडकर विचारांशी प्रतारणा असून आंबेडकरी जनतेशी विश्वासघात आहे. जन सुरक्षा विधेयक आणून दलित-आदिवासी-मुस्लीमांच्या चळवळी दडपणाऱ्या सरकारशी आनंदराज कशी काय युती कशी काय करु शकतात, असा सवाल या पत्रकात केला आहे.