मुंबई : पश्चिम उपनगरातील अंंधेरी, जोगेश्वरीचा पूर्व भाग असलेल्या के पूर्व विभागाला गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त मिळालेले नाहीत. गेल्या दोन महिन्यांत या ठिकाणी एकूण तीन सहाय्यक आयुक्त नेमण्यात आले आहेत. विलेपार्ल्यातील जैन मंदिराच्या वादानंतर येथील सहाय्यक आयुक्तांची बदली करण्यात आल्यानंतर या विभागात पूर्णवेळ सहाय्यक आयुक्तच नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या विभागातील कामे होत नसल्याचा आरोप येथील रहिवासी करू लागले आहेत.

विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्यामुळे के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांची पालिका प्रशासनाने तडकाफडकी बदली करण्यात आली. तेव्हापासून या पदावर पूर्णवेळ सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. अंधेरी आणि जोगेश्वरीचा समावेश असलेल्या के पूर्व विभागाची जबाबदारी सध्या सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शुक्ला यांच्याकडे आधीच मशीद बंदर, डोंगरीचा समावेश असलेल्या बी विभागाची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे के पूर्व विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासनात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तेव्हाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांची बदली ग्रँटरोड, नानाचौकचा समावेश असलेल्या डी विभागात करण्यात आली होती. तेव्हा घनकचरा विभागातील उपप्रमुख अभियंता नवनाथ घाडगे यांना के पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली. मात्र १६ एप्रिलला विलेपार्ले येथील जैन मंदिराचा भाग पाडल्यामुळे वाद निर्माण झाला व त्यामुळे प्रशासनाने घाडगे यांच्याकडून पद काढून घेतले व त्यांना पुन्हा घनकचरा विभागात पाठवले. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर वांद्रे पूर्वचा समावेश असलेल्या एच पूर्व विभागातील सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली. तर गेल्याच आठवड्यात क्षीरसागर यांच्या जागी नितिन शुक्ला यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यामुळे गेल्या सुमारे दीड – दोन महिन्यांपासून के पूर्व विभाग अस्थिर आहे.

पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त नसल्यामुळे या विभागातील पावसाळापूर्व कामे रखडल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या भागातील नालेसफाईची कामे रखडली आहेत. रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढली असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे आधीच बकाल असलेला हा परिसर आणखी बकाल दिसत असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षाचे विधनासभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी केला आहे.