अतिक्रमणाविरोधात पालिकेने जोरदार आघाडी उघडली असली तरी गेल्या दीड वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही खासगी निवासी इमारतीच्या जागेवरील बांधकाम हटवले जात नाही, अशी तक्रार अंधेरीतील बोनान्झा इमारतीतील रहिवाशांची असून या अतिक्रमणाने ते मेटाकुटीला आले आहेत. पोलीस संरक्षण मिळत नाही, इतर ठिकाणची अतिक्रमणे हटवायची आहेत अशी कारणे देत के पश्चिम विभाग कार्यालयाकडून सतत नकारघंटा वाजवण्यात येत आहे.
अंधेरी पश्चिमेला एसव्ही रोडवर आंबोली नाक्याजवळ बोनान्झा इमारत आहे. ही इमारत बांधली जाण्यापूर्वीपासून बाजूच्या जागेवर एक बैठे घर होते व त्याला इमारतीच्या रहिवाशांचा विरोधही नव्हता. मात्र दोन वर्षांपासून या घरातील रहिवाशांनी इमारतीच्या िभतीला लागून अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. पदपथावर बांधलेल्या या अतिक्रमित दुकानांचे छप्पर टाकण्यासाठी इमारतीच्या प्रवेशद्वाराचा आधार घेण्यात आला आहे. याबाबत रहिवाशांनी विरोध करूनही ही अतिक्रमणे हटली तर नाहीच पण त्यामध्ये आणखी वाढ होत आहे. या दुकानांना विरोध केला नाही तर इमारतीचे प्रवेशद्वारही बंद होईल, अशी भीती इमारतीतील रहिवासी करीत आहेत. याबाबत रहिवाशांनी के पश्चिम वॉर्ड कार्यालयाकडे तक्रार केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यानच्या काळात कच्चे बांधकाम तोडून पक्के करण्यात आले. सोसायटीची संरक्षक भिंत दुरुस्त करणाऱ्या गवंडय़ालाही मारहाण झाली. त्यामुळे पोलीस संरक्षण घेऊन आम्हाला भिंत उभी करावी लागली, असे एका रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मारहाण होण्याच्या भीतीने रहिवासी पुढे येऊन बोलण्याचे टाळतात.
बोनान्झा इमारतीच्या शेजारील जागा तेथे असलेल्या बैठय़ा घरमालकांच्याच नावावर आहे, असे के पश्चिम येथील साहाय्यक आयुक्त पराग मसूरकर म्हणाले. मात्र त्या अतिक्रमित आहेत. इतर ठिकाणी कारवाया सुरू असल्याने तसेच पोलीस संरक्षण मिळत नसल्याने बोनान्झा इमारतीबाहेरील अतिक्रमणावर कारवाई करण्यास विलंब होत आहे, असे पालिकेतील अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.