उत्पादक, वितरकांपोटी रुग्णांना भरुदड; १२ रुग्णालयांची तपासणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हृदयरोगावरील अँजिओप्लास्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेंटच्या भरमसाठ किमतींवर मर्यादा आणण्यात यशस्वी ठरलेल्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या कॅथेडरच्या किमतींवरही नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय औषधे किंमत प्राधिकरणाला पत्र लिहिले आहे. राज्यातील १२ रुग्णालयांच्या प्रत्यक्ष तसेच कागदपत्रांच्या आधारे केलेल्या तपासणीत कॅथेडरचा दोन ते सात वेळा पुनर्वापर केल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. रुग्णांच्या जीविताशी निगडित असलेल्या अशा प्रक्रियेत पुनर्वापर टाळण्यात यावा, याकडेही प्रशासनाचे मावळते आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी लक्ष वेधले आहे.

हृदयरोगावरील अ‍ॅन्जिओप्लास्टी प्रक्रियेत बलून आणि गाइडिंग कॅथेडर महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या कॅथेडरचा पुनर्वापर करण्यात येऊ नये. मात्र पुनर्वापर केल्यास र्निजतुकीकरण करून फार तर एकदाच वापरावा, अशी मार्गदर्शक तत्त्वे असतानाही अनेक नामांकित रुग्णालये त्याचा किमान दोन ते सात वेळा पुनर्वापर करीत असल्याची गंभीर बाब या तपासणीत उघड झाली आहे. नागपूर येथील वॉकहार्ड कंपनीने बलून तसेच गायडिंग कॅथेडरचा कमाल सात वेळा वापर केल्याचे विविध रुग्णांकडून उकळण्यात आलेल्या देयकावरून स्पष्ट झाले आहे. मुलुंडच्या फोर्टिस तसेच प्लॅटिनम इस्पितळातही दोन वेळा कॅथेडर वापरल्याचे आढळून आले आहे. औरंगाबाद येथील कमल नयन बजाज रुग्णालयानेही अनेक वेळा कॅथेडर वापरल्याचे आढळून येत आहे. कॅथेडरचा पुनर्वापर घातक असल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले. काही रुग्णालये पुनर्वापर करताना रुग्णांकडून पैसेही उकळतात, असे दिसून आल्याचे ते म्हणाले. प्रशासनाच्या गुप्तचर विभागाच्या साहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांच्यासह धनंजय जाधव, के.जी. गादेवार, शीतल देशमुख, निशिगंधा पाष्टे आदींनी दिल्ली आणि चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष तपासणी करून किमतीतील तफावत शोधून काढली आहे. राकेश नेगी (गाझियाबाद), राजीव भार्गव (दिल्ली), हरिभाऊ जानकीरामन (चेन्नई), सुनील जैन, अशोक राठोड आदींनी सहकार्य केले. बलून कॅथेडरसाठी तब्बल २५ ते ४७२ टक्के तर गायडिंग कॅथेडरसाठी इस्पितळाकडून ५० ते ५२९ टक्के नफा उकळला जात आहे. वितरकांना बलून कॅथेडरसाठी २० ते २११ टक्के तर गायडिंग कॅथेडरसाठी ६४ ते ११९ टक्के नफा मिळतो तर उत्पादक किंवा आयातदारांना बलून कॅथेडरसाठी १७ ते १२० टक्के तर गायडिंग कॅथेडरसाठी ३ ते १५४ टक्के नफा आहे. या तिघांपोटी रुग्णाला बलून कॅथेडरसाठी ७० ते ८४ टक्के तर गायडिंग कॅथेडरसाठी ४७ ते ८१ टक्के रक्कम अधिक मोजावी लागत आहे. त्यामुळे अत्यावश्यक औषधांच्या यादीत या दोन्ही कॅथेडरचा समावेश करावा, अशी मागणी डॉ. कांबळे यांनी केली आहे.

  • प्रत्यक्ष तपासणी केलेली इस्पितळे : फोर्टिस, मुलुंड; हिरानंदानी हेल्थकेअर प्रा.लि., वाशी; ज्युपिटर, ठाणे; कमल नयन बजाज, औरंगाबाद; सह्य़ाद्री, पुणे; वॉकहार्ड, नागपूर; प्लॅटिनम, मुलुंड, बीएसईएस, अंधेरी.
  • पुढील इस्पितळांतील देयकांची तपासणी : डॉ. एल. एच. हिरानंदानी, पवई, जसलोक, एशियन हार्ट, बॉम्बे इस्पितळ.
  • गाइडिंग कॅथेडर – मूळ किंमत ( रुग्णाला लागू किंमत)
  • एशियन हार्ट रुग्णालय – १६४३ (५०००)
  • बॉम्बे रुग्णालय – १९४६ (४०२५)
  • फोर्टिस, मुलुंड – १४२५ (७५५०)
  • ज्युपिटर, ठाणे – २७९५ (५८००)
  • सह्य़ाद्री, पुणे – २८३५ (७०१८)
  • हिरानंदानी, वाशी – २३४० (६७५०)
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angioplasty food and drug administration best hospitals
First published on: 08-06-2017 at 00:19 IST