scorecardresearch

मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली आणि … : अनिल देशमुख

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.

मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली आणि … : अनिल देशमुख

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. मात्र, आज (१ नोव्हेंबर) ते स्वतः ईडी कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारे व्हिडीओ देखील ट्वीट केले. यात अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि अँटेलिया स्फोटक प्रकरणाती आरोपी सचिन वाझेवर गंभीर आरोप केलेत. तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही हल्ला चढवला.

अनिल देशमुख म्हणाले, “परमबीर सिंह यांचा सहकारी एपीआय सचिन वाझे त्याने सुद्धा परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. आज सचिन वाझे खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. वाझे याआधी देखील अनेकदा तुरुंगात होता. मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली. त्याला सरकारी नोकरीतून काढल्यावर त्यानं माझ्यावर आरोप केले.”

“जो माझ्यावर आरोप करून देश सोडून पळून गेला त्यासाठी माझी ईडी-सीबीआय चौकशी”

“परमबीर सिंह आणि सचिन वाझेसारख्यांच्या आरोपांवर माझी चौकशी होत आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. त्याबद्दल मला अतिशय दुःख आहे. मी सरळ मार्गाने, नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती आहे. ३० वर्षांच्या सामाजिक-राजकीय जीवनात माझ्यावर एकही आरोप झाला नाही. पण जो माझ्यावर आरोप करून देश सोडून पळून गेला आणि सचिन वाझे जो अनेकदा तुरुंगात गेला, आज खुनाच्या आरोपात तुरुंगात आहे त्यांच्या आरोपावरून माझी ईडी, सीबीआय चौकशी सुरू आहे, ही दुःखाची गोष्ट आहे,” असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं.

“न्यायालयातील याचिकांचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये येईल”

अनिल देशमुख म्हणाले, “मला जेव्हा ईडीचा समन्स आला तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा मला ईडीचा समन्स आला तेव्हा तेव्हा मी त्यांना कळवलं की माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केलीय. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये येईल.”

“मी सीबीआयच्या कार्यालयात जाऊन दोनदा जबाब दिला”

“ईडीने जेव्हा आमच्या सर्व घरांवर छापे टाकले, तेव्हा मी व माझ्या परिवाराने, माझ्या सहकाऱ्यांनी सर्वांनी ईडीला सहकार्य केलं. सीबीआयचे मला दोनदा समन्स आले. त्या दोन्ही वेळा मी स्वतः सीबीआयच्या कार्यालयात जाऊन माझा जबाब दिला. अजूनही माझी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आज मी स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झालोय,” असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

हेही वाचा : बेपत्ता परमबीर सिंग चंदीगढमध्ये? ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’मुळे संशय बळावला!

अनिल देशमुख म्हणाले, “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह आज कुठे आहेत? प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार परमबीर सिंह भारत सोडून परदेशात पळून गेले आहेत. आरोप करणाराच पळून गेला. आज पोलीस खात्यातील अनेक अधिकारी, व्यवसायिक यांनी पोलीस स्टेशनला परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.”

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या