देवनार पशुवधगृहात कत्तलीची व्यवस्था असतानाही काही जनावरे  कत्तलीसाठी बाहेर नेण्यास दलालांना परवानगी देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांमुळेच जनावरांची अवैधरीत्या कत्तल केली जात असून त्यामुळे मांसाहारींच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याचे संकट उभे ठाकले आहे. या अवैध कत्तलीला आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या पशुवधगृह आणि बाजार विभाग या दोन्ही विभागांनी आपली जबाबदारी झटकली आहे.
देवनार पशुवधगृहामध्ये बैल, म्हैस, शेळ्या, मेंढय़ा, डुक्कर विक्रीसाठी आणले जातात. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आजारी जनावरांना मालकांकडे परत पाठविले जाते. कत्तलीसाठी योग्य असलेल्या जनावरांची येथेच कत्तल करून त्यांच्या मांसाच्या पाकिटांवर मोहर उमटवून ते विक्रीसाठी पाठविले जाते. काही वर्षांपूर्वी महापालिकेने पूर्व आणि पश्चिम उपनगरात जनावरांची कत्तल करण्यासाठी काही दलालांना परवाने दिले होते. मात्र कत्तल करून मांस विक्रीतून फारसा फायदा होत नसल्याने या दलालांनी पशुवधगृहातून खरेदी केलेल्या शेळ्या, मेंढय़ांची अनधिकृतपणे विक्री सुरू केली आहे. या शेळ्या, मेंढय़ांची अनेक ठिकाणी अनधिकृतपणे कत्तल केली जाते. तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी होत नाही. अनधिकृत कत्तलीवर अंकुश ठेवण्यासाठी बाजार विभागाची दक्षता पथके आहेत. मात्र त्यांचा काहीही उपयोग होत नाही. देवनार पशुवधगृहाच्या कामकाजाबाबत पालिका अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात सादरीकरण केले. जनावरांची कत्तलीपूर्वी कशी काळजी घेतली जाते, कत्तलीनंतर मांस कसे सुरक्षितपणे बाहेर पाठवले जाते याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली. मात्र जनावरांच्या अनधिकृत कत्तलीबाबत त्यांनी कानावर हात ठेवले.