मुंबई : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी लाठीमार आणि हवेत गोळीबार केला. या धुमश्चक्रीत आंदोलक आणि पोलीस जखमी झाले. या घटनेची दखल घेऊन जखमींची विचारपूस करण्यासाठी आतापर्यंत विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी या गावाला भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे ‘आंतरवाली सराटी’ गावाला अचानक महत्त्व आले आहे.

उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे बांधव आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत काही पोलीस आणि उपोषणकर्ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार राजेश टोपे, आमदार रोहित पवार होते. तत्पूर्वी साताऱ्याचे छत्रपती आणि भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

हेही वाचा >>> Jalna Lathi Charge: जालन्यात ऊर बडव्यांचे मगराश्रू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरे, चव्हाणांवर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनीही आंतरवाली सराटी गावाला भेट दिली. यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तसेच काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही जालन्यातील या गावाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनीही या गावाला भेट दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही  या गावाला भेट देणार आहेत. बडय़ा राजकीय नेत्यांच्या भेटीमुळे आंतरवाली सराटी गावाला अचानक महत्त्व आले आहे.