मुंबई : गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी पावणेदोन लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली नियंत्रक शिधावाटप व संचालक कार्यालयातील मुख्य निरीक्षण अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. विनायक वसंत निकम असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर अडीच लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एसीबी अधिक तपास करीत आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कांदिवली येथील गॅस एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्या नातेवाईकांची ठाणे येथे गॅस एजन्सी आहे. तक्रारदारांच्या गॅस एजन्सीवर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आणि नातेवाईकांच्या गॅस एजन्सीवर ऑगस्ट महिन्यात निकम यांनी कारवाई केली होती.
निकम याच्या सांगण्यावरून १७ जुलै रोजी तक्रारदाराने त्यांची भेट घेतली. तक्रारदारांच्या गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी महिन्याला दीड लाख आणि नातेवाईकांच्या एजेन्सीसाठी एक लाख अशी अडीच लाख रुपयांची मागणी त्याने केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.
एसीबीच्या पडताळणीत निकम यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या व नातेवाईकांच्या कामासाठी आधी अडीच लाख रुपये आणि तडजोडीअंती पावणेदोन लाख रुपये घेणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, मंगळवारी एसीबीने रचलेल्या सापळ्या निकमला पावणेदोन लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याप्रकरणी एसीबी अधिक तपास करीत आहे.