अनिश पाटील
मुंबई : मुंबईवरील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिक पातळीवर गुप्तचर माहिती संकलन करण्यासाठी गरज निर्माण झाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून मुंबईत प्रत्येक पोलीस ठाण्यात दहशतवादविरोधी कक्षाची (एटीसी) निर्मिती करण्यात आली. मुंबई पोलीस दलाला झालेल्या या कक्षाचा फायदा लक्षात घेता राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत अशा कक्षाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात नुकतीच त्याची १०० टक्के अंमबजावणी झाली.
मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा अमेरिकेहून प्रथम दुबईला गेला. तेथून १२ नोव्हेंबर, २००८ रोजी तो विमानाने मुंबईत आला. तो पवईतील एका आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्याला होता. तसेच अन्य आरोपी डेव्हिड हेडलीही मुंबईतील वास्तव्यास होता. त्यावेळी स्थानिक पातळीवर दहशतवादविरोधी कक्षासारखी दहशतवाद्यांच्या अनुषंगाने माहिती संकलन करणारी यंत्रणा असती, तर दोघांच्याही वास्तव्याबाबतची माहिती पोलिसांकडे असती. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून दहशतवादविरोधी कक्षाची २०१२ मध्ये मुंबईत निर्मिती करण्यात आली होती. या संकल्पनेच्या यशानंतर राज्यभरात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अशा कक्षाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा >>>मुंबई : कर्मचाऱ्यांसाठीच्या ‘आश्रय आवास’ योजनेत अडथळा बनलेल्या अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेचा हातोडा
दोन अधिकारी व दोन कर्मचारी स्थानिक पातळीवर केवळ दहशतवाद अथवा घातपाती कारवाया रोखण्यासाठी गुप्त माहितीचे संकलन करतात. परिसरात राहण्यासाठी आलेला नवीन भाडेकरू, जुन्या मोटरगाडय़ा अथवा दुचाकींची झालेली खरेदी – विक्री, कागदपत्रांशिवाय सीमकार्ड खरेदी करण्याचा प्रयत्न अशा माहितीचे संकलन करण्याचे काम या कक्षाकडून केले जाते. याशिवाय समुद्रकिनारा परिसरात काम करणाऱ्या मच्छीमार, परिसरातील दुकानदार, संवेदनशील ठिकाणांजवळ राहणाऱ्या व्यक्ती, मोबाइल विक्रेते, सीम कार्ड विक्रेते यांच्याशी नियमित संपर्क ठेवला जातो. रेल्वे पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाकडूनही फलाटावरील खाद्यपदार्थ विक्रेते, हमाल यांच्याशी नियमित संपर्क साधला जातो. त्यांना माहिती संकलनाचे प्रशिक्षण दिले जाते. ही संकलित केलेली माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दहशतवादविरोधी पथक (एटीएस) व राज्य गुप्तचर विभाग (एसआयडी) यांनाही देण्यात येते.
अनेक गैरप्रकार उघड..
मुंबई शहरात बेकायदेशीर उडणारे ड्रोन, चोरीच्या मोटरगाडय़ांची विक्री असे अनेक गैरप्रकार दहशतवादविरोधी कक्षाच्या सतर्कतेमुळे उघड झाले आहेत. घातपाती कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी दहतवाद विरोधी कक्षाचे महत्त्व लक्षात घेता राज्यभरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नुकतीच राज्यातील सर्वच पोलीस दलांनी त्याचे शंभर टक्के काम पूर्ण केले आहे. त्याचा फायदा नक्कीच भविष्यात होणार आहे.
हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी काय?
’ पोलीस नियंत्रण कक्ष अद्ययावत करण्यासह मुंबईत सध्या ११ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभे राहिले. ४५ हजार संख्याबळ असलेल्या मुंबई पोलिसांकडे शीघ्रकृती दल, फोर्स वनसारखे कमांडो पथक आहे. दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सात मिनिटांत प्रतिसाद देण्याची क्षमता मुंबई पोलिसांकडे आहे. २६-११च्या हल्ल्यानंतर मुंबईत अनेक अद्ययावत शस्त्रे व उपकरणे प्राप्त झाली आहेत.
’ मार्कस्मन : मुंबई हल्ल्यानंतर देशाच्या पहिल्या सशक्त बुलेटप्रूफ गाडय़ा ‘मार्कस्मन’ पोलीस दलात दाखल झाल्या. अगदी छोटी बंदूक वा अगदी हातबॉम्बपर्यंतच्या घातक हल्ल्यात हे वाहन सुरक्षा देऊ शकते. दहशतवादापासून गुंडाच्या टोळीयुद्धाच्या परिस्थितीतही याचा वापर सुरक्षा देऊ शकतो. या वाहनातून एके-४७ च्या गोळीबारापासूनही वाचता येऊ शकते. सुरक्षा व हल्ला या दोनही प्रकारांसाठी या गाडीचा वापर होऊ शकतो. त्यात एका वेळी सहा पोलीस कर्मचारी बसण्याची व्यवस्था आहे.
’ कॉम्बॅट्स : दहशतवाद्यांकडील सुसज्ज व अद्ययावत शस्त्रांपासून हे वाहन सुरक्षा देऊ शकते. पाच प्रादेशिक परिमंडळ व काही निवडक विभागांकडे ही वाहने आहेत. त्यात ग्रेनेड लाँचरसारखी सुसज्ज यंत्रणा आहे. ही वाहने चालवण्यासाठी विशेष प्रशिक्षित पोलीस कर्मचारी तैनात आहेत.
हेही वाचा >>>केईएम रुग्णालयात रक्ततपासणीसाठी गर्भवती महिला तासन तास तिष्ठत
’ रक्षक : हेदेखील बुलेटप्रूफ वाहन असून त्यात कोणत्याही हल्ल्यामध्ये शत्रूशी दोन हात करण्याची क्षमता आहे. प्रादेशिक परिमंडळ कार्यालयांमध्ये ‘रक्षक’ तैनात करण्यात आले आहे. त्यात सुसज्ज हत्यारे असून ती चालवण्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते. पाच ते सात मिनिटांत घटनास्थळी पोहोचण्याच्या दृष्टीने ही वाहने नेहमी सज्ज असतात.
’ महारक्षक : प्रतिहल्ला करण्यासाठी ‘महारक्षक’ ही खुले छप्पर असलेली व्हॅन. सशस्त्र दहशतवाद्यांकडून गोळीबार होत असलेल्या ठिकाणी कमांडोंना नेण्यासाठी ‘महारक्षक’ उत्तम आहे. सहा कमांडो या वाहनातून चार वेगळय़ा दिशेने गोळीबार करू शकतात.
’ रॅपिड इंटरव्हेक्शन वाहन : ‘रॅपिड इंटरव्हेक्शन’ वाहन दहशतवादी हल्ला अथवा दंग्याच्या ठिकाणांहून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावू शकते. अश्रुधूर सोडणारे लाँचर या वाहनाच्या समोरच्या बाजूला बसवण्यात आले आहेत.
’ अद्ययावत शस्त्रे व बुलेटप्रूफ जॅकेट : मुंबई हल्ल्यानंतर पोलील दलाला अद्ययावत शस्त्रे मिळाली. त्यात अगदी एके-४७, इन्सास रायफलीचाही समावेश आहे. रॉकेट लाँचर, ग्रेनेट प्रक्षेपण, स्नायपर बंदूकसारखी शस्त्रेही उपलब्ध आहेत.
’ शीघ्रकृती दल व फोर्स वन : मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सध्या मुंबईत फोर्स वन, शीघ्रकृती दल व एनएसजी या यंत्रणांद्वारे तीन स्तरांवर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. घातपाती कारवाईच्या वेळी सात मिनिटे प्रतिसाद वेळ असलेले शीघ्रकृती दल सुरक्षा पुरवू शकते. त्याच्यानंतर एनएसजी पथक येईपर्यंत फोर्स वन संपूर्ण स्थिती हाताळू शकते.
२६/११ हल्ल्याच्या वेळी मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’जवळील ताज महल हॉटेलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. आज १५ वर्षांनंतरही या हॉटेलसमोरून जाताना मुंबईकरांच्या मनात या हल्ल्याच्या आठवणी ताज्या होतात.