मुंबई : अँटिलिया स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन प्रकरणात गुणवत्तेच्या आधारे जामीन मिळालेल्या नरेश गौर या आरोपीने या आदेशाला स्थगिती देण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला शुक्रवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले.

 न्यायालयानेही या याचिकेची दखल घेत हे प्रकरण जामिनानंतरही आरोपीला ताब्यात ठेवण्याचे असल्याचे म्हटले. त्यावर विशेष न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन करत याप्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे (एनआयए) वेळ मागण्यात आला.

बडतर्फ पोलीस अधिकारी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे व सहआरोपी प्रदीप शर्मा यांना सिमकार्ड पुरवल्याच्या आरोपाप्रकरणी गौर याला अटक करण्यात आली होती. मात्र आपण या दोघांना केवळ सिमकार्ड पुरवले होते. त्यांनी ते कशासाठी वापरले याच्याशी आपला काहीही संबंध नाही. याप्रकरणी आपल्याला विनाकारण गोवण्यात आल्याचा दावा करत गौर याने जामिनाची मागणी करताना केला होता.