मुंबई : ॲप आधारित टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा चक्काजाम आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता. परंतु, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) चालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून बुधवारपर्यंत लेखी आश्वासन देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे ॲप आधारित टॅक्सी चालकांचे काम बंद आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. परंतु, महाराष्ट्र कामगार सभेतील प्रतिनिधींचे उपोषण सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अद्याप पूर्णपणे दिलासा मिळू सकलेला नाही.
चालकांना मिळतो कमी दर
ओला, उबरसारख्या ॲप आधारित टॅक्सी सेवांच्या चालकांना प्रतिकिमी ८ ते १२ रुपये दर मिळतो. हा दर आरटीओच्या दरानुसार असावा, अशी मागणी चालकांकडून केली जात होती. याबाबत मंगळवारी रात्री उशिरा बैठक झाली. यासंदर्भात बुधवारी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
आरटीओचे दर स्वीकारण्याची शक्यता
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेले दर सर्व ॲप आधारित सेवेसाठी लागू करण्याची शक्यता आहे. चालकांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निर्धारित केल्याप्रमाणेच दर मिळतील. तसेच प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने कूल कॅब / वातानुकूलित वाहनांसाठीचे दर ठरवताना एसयुव्ही श्रेणीतील प्रवासी वाहनांचे दर वेगळे ठरविण्याची शक्यता आहे.
आयडी रद्द होणार नाहीत
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे दर आकारल्यामुळे, तसेच प्रवाशांच्या तक्रारीची शहनिशा न करता किरकोळ कारणांवरून परस्पर ॲप आधारित टॅक्सी चालकांचे आयडी ब्लॉक केले होते. त्यामुळे यापुढे अशाप्रकारे संबंधित ॲग्रीगेटर कंपनीला आयडी ब्लॉक करता येणार नाही. तसेच ब्लॉक केलेले सर्व आयडी त्वरित सुरू करण्यात येणार आहेत.
उपोषण सुरू, बंद तूर्तास मागे
ओला, उबर कंपन्यांना सरकारी दर देण्यास मान्य केले असून, सरकारी दराने कॅब व रिक्षाचालकांनी पैसे घेतल्यास आयडी ब्लॉक करू नये, असे आदेश सहाय्यक आयुक्त परिवहन विभाग यांनी दिले आहेत. त्यामुळे तूर्तास बंद आणि चक्काजाम आंदोलन पुढे ढकलण्यात येत आहे. मात्र उपोषण सुरू राहणार आहे, असे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डाॅ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.